Header AD

ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार




ठाणे (प्रतिनिधी)  :-  येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 


30 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी ठाण्याच्या टीपटॉप प्लाझा  येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि   काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा  ठाणे पालघर  प्रभारी राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या निवडणुकीची जबाबदारी आर.सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. 


एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, या आधी ही निवडणूक अकधी गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे. उमेदवार निवडीपासून महाविकास आघाडी एकत्रित काम करणार असून ही निवडणूक आम्हाला अवघड नाही. 


डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, टीडीसीची निवडणूक लढवून आपल्या विचारांची एक संस्था ताब्यात घेऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. जर कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे ठरविले तर त्यासाठी मेहनत करायला आम्ही तिन्ही पक्षांचे नेते सज्ज आहोत. सध्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे ही निवडणूक सूप सोपी आहे. 


दरम्यान, पत्रकारांशी बोलताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, “ही सहकाराची निवडणूक आहे.सहकार अडचणीत आल्यावर सरकारने मदत करायची असते. गेले अनेक वर्षे आम्ही हेच करीत आलेलो आहोत. म्हणून सहकार क्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.”  जागा वाटपाबद्दल विचारले असता, ही पहिलीच आढावा बैठक आहे. लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 


यावेळी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा  ठाणे पालघर  प्रभारी राजेश शर्मा, आ. रवींद्र फाटक, आ. शांताराम मोरे, आ. जगन्नाथ शिंदे, ज्योती कलानी, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे- पालघर समन्वयक आनंद परांजपे, महापौर नरेश म्हस्के, जि.प,चे उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे प्रकाश पाटील  काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, नगरसेवक हणमंत जगदाळे, बाबाजी पाटील, दशरथ तिवरे, आदी उपस्थित होते. 


दरम्यान, ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी 26 ते 4 मार्च दरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 5 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 21 मार्च ही अर्ज मागे घेण्याची  अंतिम तारीख आहे. तर, 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 


या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14,  पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads