उल्हासनदी प्रदुषणा संदर्भात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी घेतली शहर अभियंत्याची भेट
◆ठोस उपाययोजना न झाल्यास राष्ट्रवादी आंदोलन सुरु ठेवणार – जगन्नाथ शिंदे....
कल्याण , कुणाल म्हात्रे : उल्हासनदी प्रदुषणासंदर्भात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंत्याची भेट घेतली. उल्हासनदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी उल्हासनदीचे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला.
उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदीपात्रात मी कल्याणकर संस्थेकडून सुरु असलेल्या आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केडीएमसी शहर अभियंत्या सपना कोळी यांची भेट घेतली. नदी जलपर्णी मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत हे जाणून घेतले. आमदार म्हणून आपण गेली 6 वर्षे उल्हास नदीतील प्रदूषणाबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.
ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपण सरकार दरबारी मागणीही करत आहोत. सध्या या प्रश्नावर आंदोलन सुरू असून केडीएमसीचे एसटीपी प्रकल्पाचे काम अर्धवट राहिल्याचे दिसत असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मंगळवारी या प्रश्नाबाबत आपण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेणार असून ठोस आश्वासन मिळाले नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस हे आंदोलन सुरूच ठेवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तर कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या टप्पा २ अंतर्गत ५ नाल्यांचे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम ७० टक्के पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी दिली. तसेच उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १५ दिवसांत ते काम केले जाईल असेही शहर अभियंत्यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment