हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय कपिल मिश्रा
कल्याण , कुणाल म्हात्रे : हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत भाजप नेते तथा माजी आमदार कपिल मिश्रा यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त बोलत होते.
सद्यस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत. देशातील विविध राजकीय पक्ष, विविध क्षेत्रांतील लोक आणि बुद्धीजीवी वर्ग हिंदूंच्या सण-उत्सवांची थट्टा करून, तसेच हिंदु धर्माला अपमानित करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहेत. हिंदूंना धर्म विसरण्यास भाग पाडले जात आहेत. देशातील हिंदु मंदिरांवर हल्ले केले जात आहेत.
राममंदिरासाठी निधी गोळा करणार्या रिंकू शर्मा या युवकाची देशाच्या राजधानीत चाकू भोसकून हत्या केली जाते. या परिस्थितीत हिंदूंकडे ‘हिंदुसंघटन’ हाच एकमेव पर्याय उरला आहे. असे न झाल्यास हिंदूंची ओळख पुसली जाईल. त्यामुळे आपापसांतील भेदभाव विसरून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी संकल्पशक्ती, उर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवे, असे आवाहन कपिल मिश्रा यांनी केले.
सभेच्या आरंभी शंखनाद झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ यांनी दीपप्रज्ज्वलन केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक आनंद जाखोटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या ‘ऑनलाइन’ सभेचा ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबुक’ यांच्या माध्यमांतून ४८ हजार लोकांनी लाभ घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ म्हणाले की, भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आदी माध्यमांतून ‘जिहाद’ चालू आहेत.
त्यांत इस्लामी नियमांनुसार चालू झालेल्या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेला आव्हान दिले आहे. ‘हलाल’ नावाच्या ‘फूड जिहाद’ला जागरूक भारतियांनी बळी न पडता त्यावर बहिष्कार घातला पाहिजे. ‘धर्मनिरपेक्षते’च्या नावाखाली चर्च आणि मशिदी यांना हातही न लावणार्या राज्य सरकारांनी केवळ हिंदूंची मोठी मंदिरे आपल्यात नियंत्रणात घेतली आहेत. सिनेमा, वेब सिरीज आदींच्या माध्यमांतून हिंदु धर्माचा अपमान केला जात आहे. हे रोखण्यासाठी भारतात ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ लागू केला पाहिजे.

Post a Comment