महाविकास आघाडी सरकार धोक्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड
कल्याण , कुणाल म्हात्रे : महाविकास आघाडी सरकार हे धोक्याचं सरकार असून, हे काय बोलतात याचं भान त्यांना नसल्याची टीका कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. भाजपतर्फे कल्याण पूर्व महावितरण कार्यलयासमोर 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही नेत्यांनी बिल कमी केलं नाही तर महावितरणचं कार्यलय राहणार नाही अशी घोषणा केली होती आता ते नेते कुठं गेले असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी केला. भाजपने महावितरण विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर आज शिवसेनेने पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन पुकारलय, मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रच्या तुलनेत इतर राज्यात पेट्रोल स्वस्त असल्याचा टोला त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांबाबत नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करत आज राज्यभरात भाजप कडून महावितरण विरोधात टाळे ठोक आंदोलन पुकारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कल्याण पूर्व महावितरण कार्यलयासमोर 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील महावितरण कार्यलयाला या टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा रेखा राजन चौधरी तसेच प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, मा नगरसेवक विक्रम तरे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, नितेश म्हात्रे, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment