कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कल्याण डोंबिवलीत पोलीस इन ऍक्शन
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिकेसह पोलीस प्रशासन ही सतर्क झाले आहे. पोलिसांनी शहरातील नागरिक, दुकाने, मॉल्स इतर आस्थापना आदींना कोरोना नियमांचे पालन करण्याचा सूचना दिल्या असून अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिला आहे. तर या नियमांचे भंग करणाऱ्या भाजपा नगरसेवकासह डी मार्ट विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना सुरु झाल्यापासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच होता. अशातच अनेक निर्बंध लावून, अनेक उपाययोजना करून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. असे असतांना गेल्या ३ ते ४ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले असून महापालिका क्षेत्रात देखील पालिका आयुक्तांनी कोरोना रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हे थांबविण्यासाठी पालिका प्रशासनासोबतच पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता अनेक राजकीय पुढारी कामाला लागले असून अनेक ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे जणू काही पिक आल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सोशल डीस्टन्सच्या नियमांची ऐशीतैशी होत असल्याचे पाहायला मिळते.अनेक ठिकाणी नागरिक मास्क देखील वापरत नाहीत. यामुळे अशा नियमांचे भंग करणाऱ्या काही जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील ४८ तासात वाढदिवस, हळदी कुंकू सोहळे आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन भाजप पदाधिकर्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर कोरोना काळातील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी डी मार्ट आस्थापनाविरोधात देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. तर इथून पुढे कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिला आहे.

Post a Comment