उल्हासनदी प्रदूषण रोखण्यासाठी आता रक्ताच्या ठशांचे निवेदन
■आता तरी जागे व्हा - सामाजिक संस्थांचे सरकारला साकडे...
कल्याण , कुणाल म्हात्रे : उल्हासनदी प्रदूषणाचा मुद्दा मागील काही दिवसापासून ऐरणीवर आला आहे. नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सामाजिक संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलन आणि पर्यावरण मंत्र्यांना पत्रे, निवेदने धाडली आहेत. मात्र तरीही नदी पात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज उल्हासनदी बचाव कृती समिती आणि राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण मंत्र्यांना रक्ताचे ठसे उमटवलेली पत्रे धाडण्यात आली आहेत. शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छेडण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो उमाई पुत्र सहभागी झाले होते.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदी पात्रात ६ ते ७ मोठ्या नाल्याद्वारे घरगुती सांडपाणी सोडले जात असल्याने नदी पात्र प्रदूषित होत आहे. या विरोधात उल्हास नदी बचाव कृती समिती, मी कल्याणकर समाजिक संघटना, राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान यासारख्या अनेक संघटनांनी आंदोलन छेडले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयती निमित्त उल्हासनदी बचाव कृती समिती मार्फत उल्हासनदीच्या पायथ्यापासून उगमापर्यंत एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन छेडले आहे. अनेक संस्थां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वताच्या रक्ताचे ठसे उमटवलेली पत्रे पर्यावरण मंत्र्यांना धाडत नदी बचावासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment