इंधन दरवाढीचा भडका, शिवसेना उतरली रस्त्यावर.. भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शने..
ठाणे , प्रतिनिधी : दररोज वाढत असलेल्या इंधन दरवाढीने सामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. कोरोनामध्ये काममधंदे बंद झाल्याने आधीच पिचून गेलेल्या सामान्य नागरिकाला आता जगणे अशक्य झाले आहे. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस ने उच्चांक गाठल्याने महागाईचा देखील भडका उडाला आहे. इतिहासात कधी नव्हे तो पेट्रोल ने शंभरी गाठली असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. याच इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी आज ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के रस्त्यावर उतरले होते.
महागाईचा निषेध करण्यासाठी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, प्रमुख नेते व हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आज काढलेल्या विराट मोर्चात सामील झाले होते. बैलगाडी, घोडगाड्या आणि सायकल घेऊन मोर्चेकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले असतांनाच सदर मोर्चा पोलिसांनी टेम्बीनाका येथे अडवला. केंद्राने लवकरात लवकर कर माफ करून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस स्वस्त करावे अन्यथा याहून तीव्र आंदोलन शिवसेनेतर्फे छेडण्यात येईल असा गंभीर इशारा महापौरांनी दिला.

Post a Comment