Header AD

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक


जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा...


ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू असलेले अशोक स्तंभ आणि टाऊन हॉलच्या नुतनीकरणानंतर ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास स्मारकातून जिवंत होणार आहे. या भव्य दिव्य संकल्पनेच्या कामास वेग आला असून आज आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कारागृह प्रशासनाच्या अधिका-यांसोबत पाहणी दौरा केला. 


ठाण्याला ऐतिहासिक वारसा असून येथील प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे म्हणजे या शहराचे मानबिंदूच आहेत. या मानबिंदूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भाजपाचे स्थानिक आमदार प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या संकल्पनेतूनच कोर्टनाका येथील अशोक स्तंभ नव्या रुपात उभा राहिला आहे तर प्रसिद्ध टाऊन हॉलचे नुतनीकरण करण्यात आले आहे. 


तसेच गेली चार वर्षे आ.केळकर पाठपुरावा करत असलेल्या ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास जागवणारा उपक्रम आता वेग घेऊ लागला आहे. आज झालेल्या संयुक्त पाहणी दौ-यात या स्मारकांची रुपरेषा ठरवण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी एक कोटी या प्रमाणे दोन कोटींचा निधी या कामासाठी मिळणार असून सुरुवातीच्या कामासाठी आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 


यावेळी बोलताना आ.केळकर यांनी सांगितले की, वधस्तंभ म्हणजे फाशी गेट येथील लाकडी सामान, खटका आदीच्या मूळ स्वरुपास धक्का न लावता सुशोभिकरण करण्यात येणार आहे तर येथील ३०० वर्षे जुन्या भिंतींची डागडुजीही पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. येथे डोम उभारून त्याखाली आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांचा इतिहास साकारला जाणार आहे. नवीन पिढीला ठाणे शहराचे महत्व आणि महात्म्य कळावे, त्याचा अभिमान वाटावा, असे स्मारक या ठिकाणी उभे राहणार आहे, असे श्री.केळकर यांनी सांगितले.


वासुदेव बळवंत फडके यांना ज्या दरवाज्यातून बोटीने एडनच्या तुरुंगाकडे रवाना केले, ते ठिकाण सुशोभित करण्यात येणार आहे. अंदमानला जाताना स्वा.सावरकरांना या कारागृहात एक दिवस येथील काळा पाणी सेलमध्ये ठेवण्यात आले होते. ज्या दरवाजातून त्यांना बोटीने अंदमानला नेण्यात आले, ते ठिकाणही जिवंत करण्यात येणार आहे. 


चिमाजी अप्पांनी या किल्ल्यावर विजय मिळवून या किल्ल्यासह ठाणे परिसर पोर्तुगीजमुक्त केला. या तुरुंगात शेकडो क्रांतिकारकांना ठेवण्यात आले होते.  येथे कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आल्याची शेवटची घटना घडली. असा सर्व इतिहास स्मारकाद्वारे  साकारुन  नव्या पिढीत राष्ट्राभिमान आणि शहराचा इतिहास जागवणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads