झाडावर आढळून येणारया पहाडी तस्कर सापांची सुटका
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण शहर हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. सध्या साप निघत असल्याच्या घटनेत वाढ झाली असतांना कोरोना परिस्थितीतही सोशल डिस्टनचे नियम पाळून वॉर रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था व सर्पमित्र हे वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती साठी कार्य करत आहेत.
कल्याणच्या गोदरेज हिल परिसरात मलबेरी मेडॉज या इमारतीमध्ये सकाळी ८ च्या सुमारास पहिल्या मजल्यावरील घरात साप शिरल्याची माहिती सोसायटीच्या नागरिकांनी वॉर टिमला दिली असता याची स्वयंसेवक रेहान मोतीवाला व सुहास पवार यांनी तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी बाल्कनीत लपून बसलेल्या पहाडी तस्कर जातीच्या सापाला सुरक्षित बचाव करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त केले. दुसर्या घटनेत वसंत व्हॅली परिसरात पहाडी तस्कर जातीचे सापाचे पिल्लू आढळून आले. त्याचा बचाव पार्थ पाठारे, प्रेम आहेर या वॉर टिमच्या स्वयंसेवकानी केला.
पहाडी तस्कर हा साप विशेषत डोंगराळ किंवा उंच पहाडावरील झाडावर आढळणारा बिनविषारी साप आहे. याचे प्रमुख अन्न हे छोटे पक्षी व त्यांची अंडी हे आहेत. तस्कर म्हणजे चोरी करणारा साप म्हणून ओळख आहे. गेल्या महिन्याभरात कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातून १६२ सापांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना यश आले आहे. या सर्व नोंदीमध्ये तस्कर जातीची नोंद ऊल्लेखनीय असल्याची माहीत वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.

Post a Comment