भाजीपाला विकायला यायचा आणि चोरी करून जायचा
कल्याण , कुणाल म्हात्रे : भाजीपाला विक्री करायला येण्याच्या नावाने चोरी करून जाणाऱ्या इगतपुरी येथील भाजीपाला व्यापारी असणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून ६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बबन दशरथ जाधव ( ३९, रा.नाशिक,इगतपुरी ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
घरची परिस्थिती बिकट असल्याने भाजी विकण्याच्या बहाण्याने तो नाशिक येथील इगतपुरी येथून बबन हा कल्याण-डोंबिवलीत यायचा. बंद घराची टेहाळनी करून संधी मिळताच घरफोडी करून निघून जायचा. मात्र इमातीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने मानपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडीवली –धोकली येथील बंद घराचे टाळे आणि कडी –कोयंटा कटावणीने तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने चोरी करून पळून गेला. मात्र इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि दादाहरी चौरे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) सुरेश मदने, पो.उपनिरीक्षक अनंत लांब, पोलीस हवालदार दामू पाटील,पोलीस नाईक विजय कोळी,मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, पोलीस शिपाई महेंद्र मंझा, प्रवीण किनरे, संतोष वायकर यांनी बबनला इगतपुरी येथून अटक केली.
पोलीस तपासात अटक आरोपी बबनकडून ४ घरफोडी गुन्हे उघडकीस आले. यात गुन्हातील १५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनि हस्तगत केले.

Post a Comment