Header AD

महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत आजपासून ठाण्यात लसीकरणास सुरूवात

 
ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहरात आजपासून (१६ जानेवारी)  कोविड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. घोडबंदर रोड येथील ठाणे महापालिकेच्या रोझा गार्डनिया या आरोग्यकेंद्रावर महापौर श्री. नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्‍थायी समिती सभापती श्री. संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या श्रीमती प्रमिला केणी, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, सिदधार्थ ओवळेकर आदि उपस्थित होते.


आज रोझा गार्डनिया आरोग्यकेंद्रावर डॉ. वृषाली गौरवार यांना पहिली लस देवून या लसीकरणाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आला. लसीबाबत मनात गैरसमज ठेवू नका. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही, कोरोनातून मुक्त करण्यासाठी ही लस उपयोगी ठरणार असून आपण सर्वानी लसीचे स्वागत करुया अशी प्रतिक्रिया डॉ वृषाली गौरवार यांनी यावेळी दिली. कोरोना संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. गेल्या १० महिन्यापासून कोरोनाशी सामना करताना अनेकांनी प्राण गमावले, त्यांची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. परंतु अखेर आज लसीकरणास सुरूवात झाली ही निश्चितच आनंदाची बाब असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.


शासनाच्या सूचनानुसार आज कोविशिल्ड या लसीकरणास ठाण्यात सुरूवात केली आहे. ठाण्यात १९ हजार लसींचा साठा करण्यात आलेला आलेला आहे. सुरूवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून शासनाच्या सूचनांनुसार पालन केले जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या लसीचे कोणतेही दुष्पपरिणाम नाहीत. लवकरच २८ केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील असेही महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.


ठाणे शहरामध्ये रोझा गार्डनिया घोडबंदर रोड, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्र अशा एकूण चार केंद्रांवर लसीकरण मोहिम आजपासून सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात एकूण ४०० आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे.दरम्यान लसीकरणासाठी ज्या ज्या कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबतचा संदेश येईल त्यांनीच निर्धारित केलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचे आहे, तरी नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत आजपासून ठाण्यात लसीकरणास सुरूवात महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत आजपासून ठाण्यात लसीकरणास सुरूवात Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads