बदलत्या पत्रकारिते बरोबर वाढती आव्हाने : कैलाश म्हापदी
■कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा...
कल्याण , कुणाल म्हात्रे : आपण पत्रकार आहोत, दररोज काय घडत आहे हे आपण समाजासमोर मांडतो, आजच्या काळानुसार पत्रकारिता देखिल बदलत चालली आहे. त्याचबरोबर पत्रकारितेतील आव्हाने देखील वाढत असून त्याबाबत आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे या बाबत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांनी आपले मत व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील 'दर्पण' हे पहिले वृत्तपत्र सुरु करुन मराठी पत्रकारितेचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिना निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन' साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने पालिकेच्या कल्याण मुख्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार व संपादक कैलाश म्हापदी, जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावतकर व पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे उपस्थित होते.
आजच्या पत्रकारांना बघून नागरिकांना जर भीती वाटत असेल तर तो आपला पराभव आहे, समाजाला आदर वाटावा असे काम आपल्या हातून घडले पाहिजे असे देखील म्हापदी यांनी कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमाला कल्याणातील पत्रकारांनी उपस्थित राहून पत्रकारदिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. पत्रकार संघाच्या वतीने सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Post a Comment