औषधी वनस्पतींचा ठेवा असावा घरोघरी - डॉ. जे पी शुक्ला
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या वर्षभरापासून सपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत असून या कठीण काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा आधार सर्वानीच घेतला आहे. यासाठीच औषधी वनस्पतींचा ठेवा असावा घरोघरी असे मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉ. जे. पी. शुक्ला यांनी व्यक्त केले आहेत. कल्याण मधील नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औषधी वनस्पतींची लागवड पिसवली येथील राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली यावेळी शुक्ला बोलत होते.
सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष देत असून यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आणि इतर आयुर्वेदिक साधनांचा वापर केला जात आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोरील जागेत अथवा कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली पाहिजे. या औषधी वनस्पतींचे अनेक फायदे असून त्यांचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती कायम राहते. तसेच अनेक आजारांपासून दूर राहता येते.
याच अनुषंगाने पिसवली येथील राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात इन्सुलिन, पानफुटी, स्टीविआ, नागदोन, पपई, अडुळसा आदी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली असल्याची माहिती साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज नित्यानंद हॉस्पिटलचे एसोसिएट प्रोफेसर आणि समाज उद्धार समितीचे सचिव आणि डॉ. जे. पी. शुक्ला यांनी दिली.
तर नगरसेवक कुणाल पाटील यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करण्याची प्राचीन काळाची पद्धत अवलंबत राधाकृष्ण मंदिरात ३१ दिवे दान करण्यात आले. तर समाज उद्धार समितिचे अध्यक्ष बबन चौबे यांनी भोजपुरी कवितेच्या माध्यमातून पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक कुणाल पाटील, समाज उद्धार समिति अध्यक्ष बबन चौबे, डॉक्टर जेपी शुक्ला, समाजसेवक अनिल पाटील, जीआरसी हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला, विवेकानंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment