कल्याण व डोंबिवलीत कोविड लसीची यशस्वी ड्रायरन
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोविड-१९ च्या लसीकरणाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार महापालिकेच्या कल्याण पुर्व येथील कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्रात व डोंबिवली पुर्व येथील पाटकर नागरी आरोग्य केंद्रात कोविड साथीच्या लसीकरणाबाबत यशस्वी ड्राय रन घेण्यात आली. लसीकरण कशाप्रकारे करण्यात येईल याची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात आली.
कोविड लसीकरणाच्या वेळेस निवडणूक पॅटर्नप्रमाणे शिस्तबध्द्व प्रक्रिया राबविण्यात येणार असून लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष,लसीकरण कक्ष आणि निरिक्षण कक्ष यांची रचना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी आरोग्य अधिकारी कर्मचारी, दुस-या टप्प्यात पोलिस, सुरक्षा कर्मचारी, शासकीय कर्मचारी तिस-या टप्प्यात वयोवृध्द व व्याधीग्रस्त आणि तद्नंतर इतर लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्याटप्प्याने रोज १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कल्याणमधील ड्रायरन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील तसेच कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली काशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. लसीकरण करणा-या कर्मचा-यांचा आत्मविश्वास या ड्रायरनमुळे वाढेल, आज कल्याण व डोंबिवली येथील प्रत्येकी २० लाभार्थी निश्चित करुन त्यांना ड्राय रनसाठी मेसेज पाठविण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी दिली.
तर डोंबिवलीतील ड्रायरन उप आयुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व डॉ. समिर सरवणकर आणि मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. किशोर चव्हाण यांनी डोंबिवलीतील पाटकर नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन ड्राय रनचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.
Post a Comment