एन.आर.सी.तील पडीक बंगल्यावर अदानी समूहाचा पोलीस बंदोबस्तात हातोडा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण नजीक असणाऱ्या मोहने येथील एनआरसी वसाहतीत पडीक बंगल्यांवर अदानी समूहाने पोलिस संरक्षणात चार जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू केली असता, कामगार व महिला वर्गाने कारवाईला विरोध दर्शविला असता पोलिसांनी बळाचा वापर करीत सौम्य लाठीचार्ज केल्याचा आरोप येथील महिला वर्गाने केला आहे. विरोध दर्शविणाऱ्या दोन महिलांसह सहा कामगार नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका महिन्यापूर्वी कामगार वसाहतीत अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली असता कामगार व महिला वर्गाने कारवाईला विरोध केला होता. आज सकाळच्या सुमारास खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी येऊन तोडक कारवाई सुरू केली. यावेळी संतप्त कामगार वर्गाने व महिलांनी व्यवस्थापन व पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करीत वातावरण अधिकच तणावग्रस्त बनवले. यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहेत तर याबाबत पोलिसांना विचारणा केली असता लाठीचार्ज केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
एन.सी.एल.ई.टी दिल्ली न्यायालयात कामगार वर्गाच्या वतीने आयटक युनियनने याचिका दाखल केली असून त्याची तारीख उद्या म्हणजे २१ जानेवारी रोजी आहे. सुनावणी होण्याचे एक दिवसा अगोदर अदानी समूहाने पडिक बंगल्यांवर कारवाई केल्याने कामगार वर्गात संतापाची लाट उसळली आहे. आंदोलन अधिक चिघळू नये याकरिता खडकपाडा पोलिसांनी आठ प्रमुख कामगार नेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले आहे.
एनआरसी संदर्भात बंगले तोडण्यास संरक्षणास आलेल्या खडकपाडा पोलिसांना महिला वर्गाने बंगले तोडण्याचे लेखी आदेश आहेत का ? असा सवाल केला असता, आदेश असेल तर आम्ही येथून लगेच जातो असे सांगितले असता पोलिस मात्र निरुत्तर झाले. संतप्त महिला वर्गाने दुपारी ४ नंतर मोहने गेट येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून रस्ता रोकोचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निकालानुसार कोणत्याही कामगाराची पूर्ण देणी दिल्याशिवाय काही करू नये असे आदेश होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागलेला नसतानाही हि कारवाई करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भीमराव डोळस यांनी दिली. तर उद्या दिल्ली येथे याप्रकरणाची केस असल्याने त्या तयारीसाठी आपण मुंबईला असून केलेल्या या कारवाईचा आपण निषेध करत असल्याची प्रतिकिया आयटकचे कॉम्रेड उदय चौधरी यांनी दिली.

Post a Comment