पत्रीपुलाच्या जोड रस्त्याचे काम आठवडा भरात पूर्ण होणार पालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवलीकरांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पत्रीपुलाच्या जोडरस्त्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरु असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पालिका आयुक्तांनी या रस्त्याच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
डोंबिवली (पूर्व) येथील म्हसोबा नगर, ठाकुर्ली ते पत्रीपुलाचा बाजूच्या रेल्वेला समांतर २४ मिटर रुंद रस्ता तयार करण्याच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केली. सदर रस्त्याचे २.२ किमी लांबीपैकी १०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम भूसंपादना अभावी प्रलंबित होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्विकारल्यानंतर सदर प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला आणि आता सदरचे काम हे अंतिम टप्यात असून येत्या आठवडा भरात सदर काम पूर्ण होईल.
हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे डोंबिवली येथून कल्याणला येणा-या प्रवाश्यांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहनांच्या इंधनातही बचत होणार आहे. या पाहणी दौ-यावेळी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, सहा. संचालक नगररचना मारुती राठोड, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, उप अभियंता प्रशांत भूजबळ व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment