कल्याण मध्ये आणखी एका माणुसकीच्या भिंतीचे लोकार्पण
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वार नजीक मोकळ्या जागेत "माणुसकीची भिंत" ही अभिनव संकल्पना राबवित या माणुसकीची भिंतीचा शुभारंभ मंगळवारी संपन्न झाला. नागरिकांना नको असलेले सुस्थितीत असणारे कपडे गोर गरीबांना उपलब्ध करीत गोर गरीबांना दिलासा मिळणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार क.डो.मपा घनकचरा विभाग, आणि प्रभागक्षेत्र आधिकारी "माणुसकीची भिंत" ही अभिनव संकल्पना राबवित असुन, घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि "क" प्रभागक्षेत्र आधिकारी भागाजी भांगरे यांच्या प्रयत्नातून आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या बाहेरील रिक्त जागेत माणुसकीची भिंत साकारण्यात आली आहे. मगंळवारी सकाळी "माणुसकीच्या भिंतीचा" शुभारंभ उपआयुक्त रामदास कोकरे आणि " क" प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भागंरे, कल्याण डोंबिवली आरोग्य निरिक्षक अगस्तिन घुटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सदर भिंतीमध्ये रकान्यांची रचना करण्यात आली असून त्यामध्ये नागरिक त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, त्यांना निरुपयोगी असलेल्या पण गरजेच्या वस्तू ठेऊ शकतील. महापालिका परिसरातील कोणीही गरजू व्यक्ती या वस्तूंचा वापर करु शकणार आहे.
"महापालिकेच्या इतर प्रभागक्षेत्रातही गरिब व गरजू व्यक्तींसाठी माणूसकीची भिंत उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, त्यांना निरुपयोगी असलेल्या पण गरजेच्या वस्तू माणुसकीच्या भिंतीमध्ये ठेऊन आपल्या समाज बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन घनकचरा उप आयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे.

Post a Comment