कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑनलाईन वधुवर परिचय मेळावा
◆ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वधू वर सहभागी.....
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणबी समाज प्रतिष्ठान कल्याणतर्फे प्रथमच ऑनलाईन वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वधू वर सहभागी झाले होते.
या मेळाव्याला कुणबी समाजातील उपवर वधूवरांचा व समाज बंधुभागिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर मेळाव्यात कुणबी समाजातील साधारण १५० वधुवरांनी भाग घेऊन ६५ मुली व ३५ मुलांनी प्रत्यक्ष झूम मिटिंग द्वारे आपला परिचय करून दिला. या ऑनलाईन मेळाव्याची संकल्पना केडीएमसी सचिव व प्रतिष्ठानचे सल्लागार संजय जाधव यांची होती. त्यांनी मेळाव्याचे होस्ट म्हणून काम पाहताना वधुवरांना बहुमूल्य मार्गदर्शन केल्यामुळे वधुवरांनी उत्तमप्रकारे आपला परिचय करून दिला.
मध्यंतरी वधुवर मंडळाचे प्रमुख केशव वेखंडे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रतिष्ठानने आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन प्रतिष्ठानच्या भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा वेध घेऊन सहभागी उपवरांना आपला जोडीदारीन व जोडीदार निवडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज आंबेकर, सचिव संतोष पाटील, खजिनदार प्रदीप विशे, संगणकिय माहिती व वधूवरांच्या अद्ययावत याद्या तयार करणारे सदस्य सुनील पाटील, कार्यकरिणीतील व वधुवर कमिटीतील पुरुष व महिला पदाधिकारी, जेष्ठ सदस्य, सदस्य व आजीव सदस्यांनी मेहनत घेतली.
मेळाव्यात सहभागी झालेले ठाणे कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी अध्यक्ष सुदाम पाटील व भगवान चंदे यांनी आपली मते मांडून प्रतिष्ठान राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा करून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. शेवटी कुणबी प्रतिष्ठानचे सचिव संतोष पाटील यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. ऑनलाईन वधुवर मेळावा हा प्रयोग पहिल्यांदाच झाला असून तो उच्च शिक्षित उपवर वधू वराना खूप आवडला असल्याची माहिती संजय जाधव यांनी दिली.

Post a Comment