अन् कल्याणच्या रस्त्यावर अवतरले यमराज हेल्मेट न घालणाऱ्यांना दिले गुलाबाचे फुल
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या रस्ता सुरक्षा अभियान सर्वत्र राबविले जात असून अपघातमुक्त रस्ते होण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. याच वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व वाहनचालकांना पटविण्यासाठी कल्याणच्या रस्त्यांवर चक्क यमराज अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुचाकीवर हेल्मेट न वापरणारे आणि चारचाकी गाडी चालवितांना सिट बेल्ट न लावणाऱ्यां वाहन चालकांना या यमराजाने थांबवत गुलाबाचे फुल देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कल्याण शहरात विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या पुढाकाराने स्टारसिटी हॉस्पिटल यांच्यावतीने पोलीस आणि रिक्षा चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दुर्गाडी चौक येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर करण्यात आले होते. यावेळी बँक ऑफ बडोदाच्या वतीने यमराजाला पाचारण करण्यात आले होते. या यमराजाने दुर्गाडी चौक येथे हेल्मेट न घालणाऱ्या आणि सिटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांना थांबवून गुलाबफुल दिले. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड, आर.एस.पी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
दरम्यान नागरिकांनी वाहने चालवतांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी यावेळी केले.
Post a Comment