ठेकेदाराच्या कामगारांची पगारासाठी पालिकेवर धडक
कल्याण , कुणाल म्हात्रे : शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना मागील तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नसल्यामुळे या कामगारांनी महापालिकेवर धडक देत वेतनाची मागणी केली. यानंतर प्रशासनाने पुढील दोन दिवसात वेतन देण्याचे तसेच प्रत्येक महिन्यात वेतन देण्याची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन या आंदोलन कर्त्यांना पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील चार प्रभागातील कचरा उचलण्याचा ठेका आरएमडी या ठेकेदाराला देण्यात आला असून या ठेकेदाराकडून त्याच्याकडे काम करणाऱ्या ४५० कामगाराचे तीन महिन्यापासून वेतनच देण्यात आलेले नसल्यामुळे या कामगारांनी कामबंद आंदोलन करत पालिकेवर धडक दिली. पालिका मुख्यालयाबाहेर कामगारांनी पालिके विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आंदोलन कर्त्याच्या दोन सदस्याशी चर्चा करत उपयुक्त कोकरे यांनी लवकरात लवकर वेतन देण्याचे दिलेले आश्वासन त्यांना मान्य नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. आपण प्रामाणिकपणे काम करत असतानाहि आपल्याला केव्हाच वेळेवर वेतन मिळत नसून तीन ते चार महिने वेतन रखडवले जात असल्याने आपल्याला पगाराची निश्चित तारीख ठरवून द्यावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली होती.
सकाळपासून आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नवर निश्चित तोडगा निघत नसल्याने अखेर नगरसेवक महेश गायकवाड यांनी कामगारांच्या वतीने उपायुक्त कोकरे यांची भेट घेत त्यांना कामगारांचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली उपायुक्त कोकरे यांनी कामगारांची भेट घेत त्यांना पुढील दोन दिवसात त्यांचे या महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले सेच दर महिन्यात होणार्या पगार विलंबाबाबत पगाराची निश्चित तारीख ठरवून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे कामगारांचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान ठेकेदाराकडून कामाची बिले सादर करण्यास विलंब होत असून ठेकेदाराकडून बिलाची वसुली करण्यासाठी कामगार युनियनचा आधार घेतला जात असल्याचा आरोप होत आहे.
Post a Comment