ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेंचे स्मारक उभारण्यासाठी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील आग्रही
ठाणे , प्रतिनिधी : धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्यात भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी भाजपचे कार्यतत्पर नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पालिकेकडे मागणी केली असून यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल १०० कोटींची तरतूद करण्याची सूचना त्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील त्यांनी दिले आहे.
कै धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य अतुलनीय आहे. ठाणे महापालिकेच्या तसेच ठाण्याचे पालकमंत्री, महापौर, अनेक लोकप्रतिनिधि, राजकीय नेत्यांच्या, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, महिला शिक्षण व सन्मान रोजगार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा सर्वच स्तरात जडणघडणीत, जिल्ह्यातील विकासात सामान्य जनतेचा जनाधार म्हणून के आनंद दिघे हे सदैव एकमेव हक्काचे आधार होते.
त्यांनी सामान्य ठाणेकरांसाठी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या सर्वच कार्यक्षेत्रातील केलेल्या कामाचा इतिहास ठाणेकरांच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणारा असावा आणि दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरावे असे भव्य दिव्य स्मारक ठाणे महापालिका क्षेत्रात उभारले गेले पाहिजे ही समस्त ठाणेकरांचीही इच्छा आहे. त्यामुळे सत्ताधार्यांनी हा विषय मनावर घेऊन ठाणेकरांची अस्मिता जपावी असे श्री. पाटील यांनी सांगितले.
यासाठी पालिकेने आगामी अर्थसंकल्पात २०२१-२२ मध्ये तातडीची ५० कोटी आणि त्याच्या पुढील वर्षात २०२२-२३ मध्ये उर्वरित ५० कोटी अशी तरतूद करावी. आणि कै धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे स्मारक उभारावे असे जेष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पालिकेला सुचविले आहे.

Post a Comment