अभय योजने अंतर्गत २०४.४८ कोटींचा महापालिकेत भरणा १५ जानेवारी पर्यत अभय योजनेची मुदतवाढ
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोविड-१९ च्या अत्यंत बिकट परिस्थितीत महापालिकेच्या थकीत करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता महापालिकेने १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये लागू केलेल्या अभय योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अभय योजने अंतर्गत ३१ डिसेंबर रात्री उशिरापर्यंत २०४.४८ कोटींचा भरणा करदात्या नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत केला आहे. ३१ डिसेंबर रोजी एक दिवसातच ३७.७५ कोटींचा भरणा महापालिकेत जमा झाला आहे. नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबाबत महापालिकेने करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.
गेल्यावर्षी १५ ऑक्टोबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ५६.०३ कोटींचा भरणा नागरिकांनी महापालिकेत केला होता. या आर्थिक वर्षातील डिसेंबर अखेर पर्यंत मालमत्ता करापोटी झालेली वसुली ३४१.३८ कोटी इतकी असून गेल्यावर्षी याच कालावधीत २१७.८४ कोटी इतकी मालमत्ता कराची वसुली झाली होती.
कोविड-१९ च्या कालावधीत महापालिकेच्या अभय योजनेच्या सवलतीचा थकीत करदात्यांना लाभ मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी १५ जानेवरी २०२१ पर्यन्त वाढविण्यात आला असून या योजनेत संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्कमी भरल्यास, ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. तरी सर्व थकीत करदात्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेमार्फ़त करण्यात आले आहे.

Post a Comment