डोंबिवलीत श्रीरामाच्या जीवन पटावर साकारली भव्य रांगोळी
डोंबिवली , शंकर जाधव : मंदिर निर्माण निधी संकलन करण्याचे काम १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिम येथील कान्होजी जेधे (भागशाला ) मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारती या संस्थेतर्फे श्री रामाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच दीनदयाळ रस्त्यावरील मारुती मंदिरासमोर १०० फुटाच्या कॅनव्हासवर विविध मनातील श्रीराम या विषयावर चित्र साकारण्यात आली आहेत. श्रीराम मंदिराचा विषय घराघरात पोहचावा हा या मागचा उद्देश असून निधी संकलन हा दुय्यम मुद्दा असल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी आमदार रवींद्र चव्हा , भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दिनेश जाधव , कोपर रोड वॉर्ड अध्यक्ष वृषभ ठाकर , डोंबिवली भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी, कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे,संस्कार भारती डोंबिवली पश्चिम सचिव सुर्वणा घोलप उपस्थित होते. यावेळी दिनेश जाधव यांनी कान्होजी जेधे मैदान प्रभागात घरोघरी जाऊन निधी संकलन करणार असल्याचे सांगितले.
डोंबिवली शहर हे भाजपचा बालेकिल्ला असल्याचे म्हंटले जाते. इतकेच नव्हे तर सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख आहे. कोरोनामुळे गेले अनेक दिवस कोणतेही कार्यक्रम शहरात झाला नाही. मात्र श्रीराम मंदिराच्या निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे राम मंदिराचा प्रसार व्हावा या हेतूने १५ बाय १५ फुटाची रांगोळी साकारण्यात आली आहे.
रांगोळी साकारण्यासाठी १६ ते २० किलो विविध रंग आणि ६० किलो पांढरी रांगोळी वापरण्यात आली असल्याची माहिती संस्कार भारतीचे उमेश पांचाळ आणि सहकलाकारांनी दिली. ही रांगोळी दोन दिवस पाहता येईल असे दिनेश जाधव यांनी सांगितले. तसेच १०० फुटाच्या कॅनव्हासवर अनेकांनी चित्र रेखाटली असून यामध्ये एका १३ वर्षाच्या आर्य माळवे या मुलाने मारुती सीतेला नमस्कार करत असल्याचे चित्र साकारले आहे.

Post a Comment