Header AD

भिवंडी पालिका शिक्षक सागर भोईर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
भिवंडी , प्रतिनिधी   :   महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेमार्फत दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक,आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार वितरित केले जात आहेत.यावर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन २०२० - २१ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार भिवंडी शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक सागर बबन भोईर यांना जाहीर झाला होता.या पुरस्काराचे वितरण सोमवारी लोणावळा (पुणे ) येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षाताई गायकवाड ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी सिक्कीमचे मा. राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संजय जगताप, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक श्री. दत्तात्रय जगताप, उपसंचालक औदुंबर उकिरडे, सहायक संचालक मीनाक्षी शेंडकर तसेच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.भिवंडी पालिका शिक्षण मंडळाच्या एका शिक्षकाने राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याने त्यांचे संपूर्ण शिक्षण वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.


सागर भोईर हे गेल्या बारा वर्षांपासून भिवंडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत.त्यांनी महानगरपालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.विद्यार्थी व पालक यांच्याशी असणारे सौहार्दाचे संबंध जपणे हि त्यांची सर्वात जमेची बाजू आहे.पटसंख्या वाढविण्यासाठी त्यांनी अनेक कृती संशोधन व नवोपक्रम राबवले आहेत.त्यासोबतच  महानगरपालिकेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत विशेष मार्गदर्शन गेले अनेक वर्षे करीत आहेत.सध्या ते पालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्र.०२ , शांतीनगर येथे कार्यरत आहेत.या अगोदर शाळा क्र. ४६ व शाळा क्र.९३ चाविंद्रा येथे शैक्षणिक सेवा बजावली आहे.विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमात गौरव केला आहे.


कला व क्रीडा या क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.ते स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा पंच आहेत.त्यांच्याकडे असणाऱ्या क्रीडा नैपुण्याचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त कालावधीमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा प्रशिक्षण चालू केले आहे.ज्याचा फायदा महानगरपालिकेतील गरीब विद्यार्थ्यांना होऊन अनेक विद्यार्थ्यांनी खोखो,लंगडी, कबड्डी,ॲथलेटिक्स अशा मैदानी खेळात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर महानगरपालिका शाळेचे नाव उज्वल केले आहे.सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने या काळात, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, फोनच्या मार्फत वैयक्तिक मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव कामगिरी केली आहे.लहानपणापासून असलेली समाजसेवेची आवड त्यांनी जोपासली आहे.


विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या काही समस्या निर्माण झाल्यास त्या निराकरणासाठी ते सदैव झटत असतात.या अगोदर त्यांना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळ तसेच विविध संस्था यांच्यामार्फत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने घेवून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी जाहीर केला होता.एका कार्यकुशल, मेहनती व प्रामाणिक शिक्षकाला हा पुरस्कार प्रदान झाल्याने भिवंडी महानगरपालिका शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.भिवंडी विभागातील सर्व शिक्षक संघटनांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
भिवंडी पालिका शिक्षक सागर भोईर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान भिवंडी पालिका शिक्षक सागर भोईर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads