राष्ट्रीय बालिका दिना निमित्त मुलींच्या नावाने वृक्षारोपण
◆वृक्षांना मुलींचे नाव देणे हे मुलींच्या सशक्तिकरणाचं उदहारण - डॉ जे पी शुक्ला पिसवली येथील स्मशानभूमि विविध रोपांची लागवड...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण मधील पिसवली येथील स्मशानभूमीत मुलींच्या नावाने वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीने राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. वृक्षांना मुलींचे नाव देणे हे मुलींच्या सशक्तीकरणाचं चांगलं उदाहरण असल्याचं मत यावेळी बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचे पिसवली येथील ब्रँड अम्बेसीडर डॉ. जे. पी. शुक्ला यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण बिट आजदे १ पिसवली गाव येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी पिसवली येथील स्मशानभूमीत मुलींच्या नावे रोपं लावण्यात आले. या रोपांमध्ये नारळ, पिंपळ, आंबा, वड, उंबर अशी विविध प्रकारची झाडं लावली. त्या झाडांना मुलींचे नावं देण्यात आली. पिसवली येथील बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचे ब्रँड अम्बेसीडर डॉ. जे. पी. शुक्ला यांनी अशाप्रकारे वृक्षांना मुलींचे नाव देणे हे मुलींच्या सशक्तीकरणाचं चांगलं उदाहरण असल्याचं मत यावेळी व्यक्त केले. तसेच मुलगी जन्माला आली म्हणून दुखः न मानता तिला चांगलं शिकवून मोठं केलं पाहिजे, घरातील एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला शिकवते असे सांगत मुली वाचविण्याचा आणि त्यांना शिकविण्याचा संदेश उपस्थितांना दिला.
स्मशानात प्रेतयात्रे सोबत येणाऱ्या लोकांना सावली मिळावी म्हणून हा उपक्रम स्मशानभूमीत राबविण्यात आला. याठिकाणी पेरू, आंबा, वड, नीम आदी प्रकारची रोपं लावण्यात आली. झाडांचे जसे संगोपन करतो त्या प्रमाणे मुलीचं संगोपन करू ही शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका उषा लांडगे, मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला, पिसवली येथील ग्रामस्थ नागेश माळी, दिनेश पाठक आणि पिसवली येथील १२ अंगणवाडी सेविका मदतनीस, मुली व त्याचे पालक उपस्थित होते.

Post a Comment