म्होरकी, आदिवासी महिला संघटने कडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
कल्याण , कुणाल म्हात्रे : म्होरकी, आदिवासी महिला वेलफेअर असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेच्या म्होरकी, आदिवासी महिला संघटनेकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे नगरसेविका शितल मंढारी यांच्या अमराई, विजयनगर येथील कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणुन संघटनेच्या राज्य अध्यक्ष प्रमिला मसराम, तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई प्रदेश अध्यक्ष कुंदा चांदेकर, कल्याण तालुका अध्यक्ष उषा सयाम प्रामुख्याने उपस्थित होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर अर्चना आत्राम व संध्या केळसकर यांनी महिला गीत सादर केले. यावेळी मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ.विनोद कुमरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले विचार मांडले. जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत 'परफ्यूम प्रशिक्षण' ठेवण्यात आले होते. रेषमा खरात यांनी आदिवासी महिलांना परफ्यूम कसा तयार करायचा व त्याला बाजारपेठ कशी उपलब्ध होऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी म्होरकी आदिवासी संघटनेच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष कुंदा चांदेकर यांनी सर्व महिलांना आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या तर सघटनेच्या राज्यअध्यक्ष प्रमिला मसराम यांनी जयंती कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मांडला. आपल्या अध्यक्षीय समारोपातून त्यांनी आदिवासी महिलांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी असणाऱ्या स्वंयरोजगार व प्रशिक्षण याबाबत शासकीय धोरणाबाबत आपले विचार नोंदवित व यापुढे आदिवासी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करुन कार्यक्रमाचे आभार नगरसेविका शितल मंढारी यांनी मांडले.

Post a Comment