कोरोनापेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघाता मुळे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे कल्याण मध्ये रस्ता सुरक्षा अभियानाला सुरवात
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या सर्वत्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरु असून कोरोनापेक्षा भयंकर असणाऱ्या रस्ते अपघातांकडे मात्र दुर्लक्ष होत असून कोरोनापेक्षा जास्त मृत्यू हे गेल्या वर्षी रस्ते अपघातात झाली असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्त्तात्रय कराळे यांनी दिली. कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ चे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, अनिल पोवार, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आदींसह आर.एस.पी. शिक्षक, रिक्षा चालक उपस्थित होते.
यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा गौरव करण्यात आला. कोरोना सुरु झाल्या पासून सुमारे १ लाख ५२ हजार मृत्य हे कोरोनामुळे झाले असून मागच्या वर्षी १ लाख ५४ हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. यामुळे कोरोनापेक्षाही रस्ते अपघातांची समस्या गंभीर आहे. दरवर्षी ५ लाखच्या आसपास अपघात होतात त्यापैकी दीड लाखच्या आसपास मृत्युमुखी पडतात तर सुमारे ४ लाख लोकं जायबंदी होत आहेत. दरवर्षी एवढे मृत्यू अपघाताने होत असतील तर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले.
तर वाहतुकीचे नियम आधी लोकप्रतिनिधी पाळायला हवे. अपघात कधीही घडू शकतो, अपघातांच्या कारणांचा विचार केला पाहिजे. खरे कोरोना योद्धा हे पोलीस असून कोरोना काळात परिवाराची तमा न करता पोलीस बाहेर होते. कोरोनामुळे जास्त पोलिसांचा मृत्यू झाला हे दुर्दैव असून कल्याणमध्ये मनुष्यबळ कमी असतांना देखील वाहतूक पोलीस चांगले काम करीत असल्याचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.
कोरोनापेक्षाही वाहतूक अपघातांची लाट मोठी असून कोरोना थांबविण्यासाठी ज्या उपाययोजना करतोय त्याच्या २ टक्के जरी उपाययोजना अपघात थांबविण्यासाठी केल्या तरी वाहतूक अपघात थांबतील. लोकं चांगल्या गोष्टीच अनुकरण कोणीही करत नाही मात्र वाईट गोष्टींचं अनुकरण करतात. सिग्नल ट्रॅप लावण्याऐवजी नागरिकांनी स्वतःवर ट्रॅप लावावा असे आवाहन वाहतूक शाखा उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.
तर १३ मार्चला पहिला कोविड रुग्ण कल्याणमध्ये सापडला यानंतर पोलिसांच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण आणलं आहे. कोरोनाचा केडीएमसी पॅटर्न महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. केडीएमसी मधील बेवारस वाहनं उचलण्याचा पॅटर्न देखील महाराष्ट्राने अवलंबला. त्यामुळे रस्ते सुरक्षेसाठी एखादी नवीन सुरवात करायची झाली तर कल्याण मधूनच करू. केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह न पाळता वर्षभर रस्ता सुरक्षेसाठी काम केलं पाहिजे असे मत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी व्यक्त केले.
Post a Comment