तरुण मंडळीच भजनाची परंपरा पुढे सुरू ठेवतील : महापौर नरेश म्हस्के
ठाणे, ता. 28 : तरुणाईला डीजे चे आकर्षण असले तरी भजन गाणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या देखील लक्षणीय असल्याने भजनाकडे तरुणांचा ओढा दिसून येतो याचा प्रत्यय ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत दिसून आला. या स्पर्धेत ज्येष्ठांसह तरुण व लहान मुले देखील सहभागी झाली असून तरुण मंडळीच भजनाची परंपरा पुढे सुरू ठेवतील यात शंका नाही, धर्मवीर आनंद दिघे यांनी भजन संस्कृती रुजविली असून ती पुढेही अशीच सुरू राहिल असे वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी येथे केले.
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ठाणे महापौर चषक भजन स्पर्धा 2021 चे आयोजन धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त (27 जानेवारी) आर्य क्रीडा मंडळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, क्रीडा आणि समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा त्याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेत एकूण 20 भजनी मंडळे सहभागी झाली होती. अत्यंत तालबद्ध झालेल्या या स्पर्धेत 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मुरबाड येथील जय हनुमान प्रासादिक मंडळाने पटकाविले. 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक सुरताल भजनी मंडळ, नारंगी यांनी, 10 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक नादब्रह्म भजनी मंडळ, कर्जत यांनी, तर 5 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे संतकृपा भजनी मंडळ,विटावा व श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड यांनी पटकाविले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये कल्पेश शिंगोळे यांनी उत्कृष्ट पखवाजवादक, सिध्देश चव्हाण यांनी उत्कृष्ट झांजवादक, सर्वेश पांचाळ यांनी उत्कृष्ट तबलावादक, भूषण देशमुख यांनी उत्कृष्ट गायनाचे तर मकरंद तुळसकर यांनी उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून प्रत्येकास 5 हजार रुपयांचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून पंडीत भिमसेन जोशींचे शिष्य नंदकुमार पाटील हे होते तर परीक्षक म्हणून नितीन वर्तक व भूषण चव्हाण यांनी काम पाहिले.

Post a Comment