डोंबिवलीत `सायबर गुन्हे जनजागृती` पथनाट्य
डोंबिवली , शंकर जाधव :`पोलीस रेजिंग डे` निमित्त रामनगर पोलीस ठाणे तसेच ईगल ब्रिगेड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने`सायबर गुन्हे जनजागृती`या विषयावर डोंबिवलीकरांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील इंदिरा चौक व रेल्वे स्टेशनसमोर पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.
दिवसेदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत असल्याने पथनाट्याच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला. ऑनलाइन व्यवहार करताना फसवणूक होत असल्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे `सायबर गुन्हे जनजागृती` वर पथनाट्य घेतल्याचे ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.
पथनात्याच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्याल याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सायबर गुन्हे जनजागृतीपर माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.यावेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ईगल ब्रिगेडचे संजय गायकवाड, शंतनु सावंत आणि अनुप इनामदार यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment