केडीएमसी निवडणुकी साठी विशेष संपर्क मंत्री नेमण्याची शरद पवारांकडे मागणी
■राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला उभारी देण्यासाठी नोवेल साळवे यांचे पवारांना पत्र....
कल्याण , कुणाल म्हात्रे : आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ठाणे जिल्ह्याकरिता विशेष संपर्क मंत्री नियुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या आगामी निवडणूकीसाठी राष्ट्रवादी पक्षाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षाची परिस्थिती कल्याण जिल्हयात नाजूक असल्याने थोडे परिवर्तन होणे आवश्यक आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री हे महाविकास आघाडी सरकार मधील मित्र पक्षाचे आहेत. ते त्यांच्या पक्षाला व पक्षातील कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचे काम योग्यरीतीने करीत आहेत. परंतु ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना फक्त स्व:ताचा मतदारसंघ व कुटुंबियांपुरतेच मर्यादित विचार करता येतो. पक्षाच्या वरिष्ठांनी ठाणे जिल्हा महाविकास आघाडी सरकार मधील मित्र पक्षाला भेट म्हणून दिला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे नोवेल साळवे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
पक्षातील नेत्यांना कल्याण जिल्ह्याबद्दल काहीही एक पडलेल दिसून येत नाही. फक्त तळागळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच पक्षाबद्दल प्रेम आहे आणि त्यांनाच शरदच पवार यांचे कष्ट दिसत आहेत. तरी ठाणे जिल्ह्याला छगन भुजबळ किंवा नवाब मलिक यांच्यासारखे धाडसी निर्णय घेणाऱ्या व्यक्तिला इथे विषेश संपर्क मंत्री नियुक्त करावे जेणेकरून पक्ष वाढीसाठी आणि जनतेचे काम होण्यासाठी मोठी मदत होईल असे मत नोवेल साळवे यांनी शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे साळवे यांच्या पत्राबाबत शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

Post a Comment