कल्याण , कुणाल म्हात्रे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी चिखल, धोंडे, शेणाचे गोळे खाल्ल्याने आज माझ्यावर फुलांचा वर्षाव होत असल्याची भावना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वंशज नीता होले यांनी व्यक्त केली. विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्व यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वंशज नीता होले यांच्याहस्ते कल्याण मधील शेकडो आंगणवाडी सेविकांचा कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्वच्या अध्यक्षा भारती जाधव यांनी या कार्यक्रमाचे आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजन केले होते. समितीच्या वतीने पहील्यांदाच सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रिपाईचे नेते अण्णा रोकडे, विवेक जगताप, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक विजया पोटे, स्नेहल शिंदें, राजेन्द्र नितनवरे, आशा तिरपुडे, राधिका निरभवणे, सुशीला नितनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याकाळी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या. त्यांच्यावर चिखल, धोंडे, शेणाचे गोळे फेकले गेले. हे सर्व त्यांनी त्याकाळी सोसल्याने त्यांची वंशज म्हणून मी जिथे जाईल तिथे माझ्यावर फुलांचा वर्षाव होत असल्याची भावना नीता होले यांनी व्यक्त केली. कोरोना काळात नागरिकांची आणि रुग्णांची माहिती गोळा करण्यासाठी आंगणवाडी सेविकांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीमुळेच आज कोरोना काहीप्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच मुलींनी भरपूर शिकून स्वतःची आणि आपल्या कुटुंबासह इतरांची देखील प्रगती करावी असे आवाहन केले.
Post a Comment