अभय योजने मध्ये मालमत्ता करापोटी महापालिकेत ७०.२६ कोटींचा भरणा
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या ९ महिन्यात कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या करदात्यांना कर भरणे सोपे व्हावे याकरिता महापालिकेने १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत " अभय योजना-२०२०” लागू केली. १५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी रु. ७०.२६ कोटी इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत भरणा केलेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत रु.३३.६३ कोटी इतकी रक्कम महापालिकेकडे मालमत्ता करापोटी जमा झाली होती.
अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर,२०२० पर्यंतच आहे. या योजनेमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्कमी भरल्यास, ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. अभय योजनेस मुदत वाढ देण्यात येणार नसल्याने सर्व थकीत करदात्यांनी आपल्या मालमत्ता कराची रक्कम ३१ डिसेंबर,२०२० किंवा त्यापूर्वी जमा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment