सेक्रेट हार्ट शाळेचा "ग्रो युवर ग्रीन्स" उपक्रम
कल्याण , कुणाल म्हात्रे : भारतातील ग्रीनस्कुल तसेच शेतीची शाळा म्हणून प्रसिध्द असलेल्या कल्याण मधील सेक्रेट हार्ट शाळेने "ग्रो युवर ग्रीन्स" नावाचा उपक्रम आपल्या शाळेचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुरू केला आहे. सदरच्या उपक्रमात शाळेच्या आवारात उपलब्ध रिकाम्या जागेत वाफे तयार करून हे वाफे शिक्षकांना पालेभाज्या लावण्यासाठी देण्यात आले आहेत.
घरासाठी आवश्यक पालेभाज्या, फळभाज्या उगवण्याची इच्छा असणारे हौशी शिक्षक यात सहभागी झाले असून त्यात उगवणारा भाजीपाला ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. १००% सेंद्रिय पद्धतीने केली जाणाऱ्या ह्या शहरी शेतीसाठी शाळेचे पर्यावरण आणि शेतीविभागाचे शिक्षक सृष्टीमित्र भरत गोडांबे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदरच्या प्रकल्पामुळे शिक्षक मंडळींना सेंद्रिय शेतीचा तसेच विषमुक्त भाजीपाल्याचा आनंद घेता येणार आहे. बिया लावणे, रोपे बनवणे, रोपांची पुर्नलगवड करणे, पाणी देणे, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन ही सगळी कामे शिक्षक मंडळीच करणार आहेत.
या प्रकल्पात सध्या २० हौशी शिक्षक सहभागी झाले असून त्यांनी आपल्याला उपलब्ध झालेल्या जागेत मेथी, माठ, पालक, कोथिंबीर, कोबी, कांदा, मिरची, टोमॅटो, गाजर, बीट, नवलकोल, भेंडी, हरभरा, वाटाणा, मका, कारली, लाल भोपळा, पडवळ, दुधी भोपळा यासारख्या भाज्यांची लागवड केली आहे. या प्रकल्पाची संकल्पना आणि रचना ही शाळेचे शिक्षक मोझेस यांची असून यासाठी शाळा व्यवस्थापनाचे प्रमुख अल्बिन सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापक विनिता राज यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. जागतिक महामारी कोरोनापासून बचावाचे सगळे नियम काटेकोरपणे पाळून हा आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे.

Post a Comment