शेतकर्यांनी पुकारलेल्या बंदला रिपाइं एकतावादीचा पाठिंबा
ठाणे , प्रतिनिधी : मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषि कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी मंगळवारी (दि. 8) पुकारलेल्या बंदला रिपाइं एकतावादीने पाठिंबा दिला असून या बंदमध्ये सक्रीय सहभाग घेणाार आहे, अशी माहिती रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली. केंद्र सरकारने आणलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकर्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकर्यांनी मंगळवारी बंदचे अआवाहन केले आहे. या बंदला रिपाइं एकतावादीने पाठिंबा दिला आहे.
नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले की, मंगळवारच्या बंदमध्ये सर्वांचाच सबंध आहे. कारण, हा बंद कोण्या राजकीय पक्षाने पुकारलेला नाही. तर, या बंदचे आवाहन अन्नदात्याने केले आहे. अन्नदाताच जर उपाशी राहणार असेल तर ज्यांचा शेतीशी सबंधही नाही, अशा लोकांची पोटं कशी काय भरणार? भारताचा आर्थिक कणा शेतीवर अवलंबून आहे. सुमारे 14 टक्के अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे. असे असताना शेतकरी हिताचा आव आणून एखादा कायदा केला जात असेल; अन् ज्यांच्यासाठी हा कायदा केला आहे. त्या बळीराजालाच हा कायदा नको असेल; तर, नक्कीच हा कायदा शेतकरी हिताचा नाही, हेच स्पष्ट होत आहे.
हा देश शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी घडविला आहे. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शेतकरी आणि विद्यार्थीच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जगाचा इतिहास असे सांगतो की युवक-विद्यार्थी अन् शेतकरी एकत्र आले तर सिंहासने उदध्वस्त झाली आहेत. अन् याच शेतकरी तथा विद्यार्थ्यांना देशद्रोही किंवा दहशतवादी ठरविण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारचा हा एल्गार हा बहुसंख्यांकांचा ठरणार आहे. हे आंदोलन अन्नदात्याचे आहे. अन् अन्नदात्याच्या या आंदोलनात सर्वांनीच सहभागी व्हायला हवे. कारण, आज जे शेतकरी नाहीत: त्यांचे पूर्वज शेतकरीच होते. अन् शेतकर्यांच्या घामावरच हा देश घडला आहे. अन् या घामाचे ॠण फेडण्याची हीच वेळ आहे. त्यामुळेच आम्ही या बंदला सक्रीय सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले.

Post a Comment