फेरीवाल्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय,दिवा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा महापालिके समोर धरणे आंदोलन रोहिदास मुंडे

दिवा, प्रतिनिधी : दिवा स्टेशन परिसरात फेरीवाले मोठ्या संख्येने असल्याने नागरिकांना चालण्यास देखील अडथळा होत असून वाहतूक कोंडी देखील होत आहे.फेरीवाल्यांसाठी अन्य ठिकाणी मोकळ्या जागेत व्यवस्था करा आणि दिवा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा महापालिकेसमोर धरणे आंदोलन करू असा इशारा भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
दिवा रेल्वे स्टेशन परिसरात पूर्वेकडे रस्त्याच्या दुतर्फा असणारे फुटपाथ फेरीवाल्यांनी अतिक्रमित केल्याने शहरातील नागरिकांना चालण्यास जागा मिळत नाही तर या परिसरात वाहतूक कोंडी देखील मोठया प्रमाणात होते. पालिका प्रशासनाने नियमानुसार दिवा स्टेशन परिसरातील रस्ते मोकळे करून येथील वाहतूक कोंडी टाळायला हवी अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केली आहे.सायंकाळी दिव्यातील रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पूर्णपणे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ठरत असतात.
नागरिकांना चालण्यास देखील जागा रस्त्याच्या बाजूला उपलब्ध नसते.मुळात दिवा स्टेशन परिसरात फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढणे व नागरिकांना याचा त्रास होणे हे येथील नगरसेवकांचे अपयश आहे असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.दिवा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करून नागरिकांना दिलासा न दिल्यास आपण महापालिका कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करू असा इशारा मुंडे यांनी दिले आहे.
फेरीवाल्यांसाठी दिवा शहरात राखीव जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था अथवा बाजार भरविण्यात यावा,नागरिकांसाठी असणारे रस्ते मोकळे ठेवावेत अशी आपली भूमिका असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment