पालिका आयुक्तांनी केली बीएसयूपी प्रकल्प आणि परिवहन आगाराची पाहणी
कल्याण , कुणाल म्हात्रे : महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांनी महापालिका परिसरातील अनेक चालू असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान प्रलंबित कामे त्वरेने पुर्ण करण्याबाबत संबंधीतांना सूचना दिल्या.
महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कल्याण पश्चिम येथील गणेश घाट परिसरातील परिवहन कार्यशाळेची स्वत: पाहणी करुन परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी बसेस स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वॉशिंग रॅम्पची पाहणी केली आणि कोरोना कालावधीत काटाक्षाने बसेस दररोज स्वच्छ करुन सुरु करणे बाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे वालधुनी नदीच्या संरक्षक भिंतीची देखील पाहणी केली. गणेश घाटालगत वालधुनी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी देखील या वेळी त्यांनी केली,सदर ब्रिज फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दर पावसाळयात वालधुनी नदीला पूर येऊन परिवहन आगारात पाणी शिरते, त्यामुळे आगाराची संरक्षण भिंत दुरुस्त करणे गरजेचे असल्याबाबत माहिती परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी यावेळी दिली. प्रस्तावित सीएनजी पंपाच्या जागेची पाहणी देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केली. निधीच्या कमतरतेमुळे सर्वच कामे करणे शक्य नसले तरी अत्यावश्यक कामांचा प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देवू असे आश्वासन या भेटीच्या वेळी आयुक्तांनी दिले.
महापालिके तर्फे बारावे आ्णि उंबर्डे येथील सुरु असलेल्या बीएसयूपी प्रकल्पातील घरांची देखील पाहणी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केली. बारावे येथे बीएसयूपी अंतर्गत एकूण १२४३ घरे तयार होत असून या घरांचे सिव्हील वर्क पूर्ण झाले असून सदनिकांच्या आतले विदयुतीकरणाचे व उद्वाहनाचे काम सूरु आहे. सदर कामे मार्च अखेर पर्यंत पुर्ण करणे बाबत सूचना त्यांनी संबंधीत ठेकेदाराना व अभियंत्यांना दिल्या. उंबर्डे येथे बीएसयूपी अंतर्गत १५०० घरे तयार होत असून त्यांचे आर.सी.सी काम पुर्ण झाले आहे. त्यापैकी ७०० घरे फेबु्वारी अखेर पर्यंत पुर्ण करुन ताब्यात देणे बाबत सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या. यावेळी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट, कार्यकरी अभियंता सुनील जोशी, जगदीश कोरे, उप अभियंता भालचंद्र नेमाडे व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment