वंचित बहुजन आघाडीच्या कल्याण पूर्व शहर अध्यक्षपदी मनोज धुमाळ
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसांत जाहीर होणार असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कल्याण पूर्व शहर अध्यक्षपदी समाजसेवक मनोज धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी समाजसेविका अश्विनी धुमाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणच्या निवडणुका लांबल्या असून आता कोरोनाचा प्रादुभार्व काही प्रमाणात कमी झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आणि इतर निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक देखील येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपली पक्षबांधणी करण्यास सुरवात केली आहे. वंचित बहुजन आघाडी देखील आपली संघटना मजबूत करत आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कल्याण पूर्व शहर अध्यक्षपदी समाजसेवक मनोज धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हि घोषणा करण्यात आली.
धुमाळ यांच्या निवडीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. तर पक्षाने आपल्यावर जी जवाबदारी दिली आहे ती योग्य रीतीने पार पाडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांना सोबत घेऊन एकोप्याने आणि जोमाने काम करणार असल्याचे मनोज धुमाळ यांनी सांगितले.
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असून स्वबळावर निवडणूक लढवत महापालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment