धनसार गावच्या सरपंचाची वीजचोरी उघड पथकाच्या कारवाईत बाधा व धमकावले गुन्हा दाखल
पालघर , प्रतिनिधी : तालुक्यातील धनसार गावचे सरपंच राजेंद्र घरत यांच्या निवासस्थानी चोरीच्या विजेचा वापर आढळून आला आहे. तपासणी दरम्यान सरपंच घरत यांच्याकडून महावितरणच्या पथकाला धमकावण्यात आले व कारवाईत अडथळा निर्माण करण्यात आला. याप्रकरणी घरत यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला असून पालघर पोलीस गुन्ह्याचा तपस करत आहेत.
सरपंच घरत यांच्या घरातील मीटरमध्ये फेरबदल करून तसेच मीटर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे तपासणीत आढळले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पथकाने कारवाई सुरु केली. घरत यांनी घरातील वीज संच तपासणीत अडथळे आणून घरात येण्यास मज्जाव केला. तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावले. त्यामुळे पथकाने पोलिसांची मदत घेतली. मात्र सरपंच घरत यांनी पोलिसांसमोर पुन्हा शिवीगाळ करून पथकातील कर्मचाऱ्यांना धमकावले. याप्रकरणी घरत विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या मदतीने घरत यांच्या घरातील वीज पुरवठ्याची तपासणी केली असता सर्विस वायरला टॅपिंग करुन मिटर विना तसेच मिटरद्वारे अशा दोन्ही प्रकारे वीज पुरवठा करण्याची तजवीज करून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. घरात यांने ९१ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. वीजचोरीचे ९१ हजार व दंडाचे ८ हजार रुपये भरण्याची नोटीस घरत यांना देण्यात आली असून भरणा न झाल्यास वीजचोरीची गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद दिली जाईल. या कारवाईत धनसार गावात सरपंच घरत यांच्यासह पाच जणांकडील वीजचोरी उघडकीस आली.
पालघर जिल्ह्यात वीज चोरट्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम उघडली आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली नियमितपणे ही कारवाई सुरु राहणार आहे. त्यामुळे महावितरणकडून सहजपणे मिळणारी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment