भिवंडीत भात उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर आंदोलन
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडीतील दुगाड फाटा केंद्रावर भात उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी भात खरेदी केंद्रावर आंदोलन केलं आहे. या आंदोलना दरम्यान भात खरेदीतील ऑनलाईन पद्धत बंद करून हेक्टरी ३७ क्विंटल पर्यंत भात खरेदी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आलीय. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. देशभर सध्या शेतकरी आंदोलन तापले असतांनाच भिवंडीतील दुगाड फाटा येथे असलेल्या भात खरेदी केंद्रावर प्रति हेक्टर १५ क्विंटल भात खरेदी करण्यात येत असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात विक्रीसाठी या खरेदीकेंद्रावर आणला होता.
यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रापर्यंत भाताची मालवाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट व इतर खर्च मोठ्या प्रमाणात उचलला असूनही या खरेदी केंद्रावर फक्त प्रति हेक्टरी १५ क्विंटल भाताची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी किमान ३७ क्विंटल प्रति हेक्टरी भात खरेदी करावी अशी विनंती केली मात्र त्यास खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून नकार दिल्याने अखेर भात उत्पादक शेतकऱ्यांनी या खरेदीकेंद्राची खरेदी विक्री प्रक्रिया बंद करून या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने लागू केलेली ऑनलाइन पद्धत देखील रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा अशी मागणी ठाणे जिल्हा शेतकरी संघर्ष संघटनेने या आंदोलना दरम्यान केली आहे.
भिवंडीत भात उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर आंदोलन
Reviewed by News1 Marathi
on
December 28, 2020
Rating:

Post a Comment