नववर्षाच्या स्वागतासाठी तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसर सज्ज
भिवंडी , प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेले वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी परिसरातील हॉटेल,रिसॉर्ट आणि मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.दरम्यान यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्याने यावर्षी प्रचंड प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात सदर परिसर असल्याने त्याचबरोबर पर्यटनासमवेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनही होत असल्याने मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी नववर्ष साजरे करण्यासाठी येत असतात.सरत्या वर्षाला या ठिकाणी येऊन नदीकिनारी नाच गाणी करीत निरोप देऊन आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे अकलोली येथील पवित्र गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून वज्रेश्वरी येथे देवीचे दर्शन घेऊन गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद स्वामी समाधी मंदिराचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबई, ठाणे,भिवंडी,कल्याण येथील पर्यटकांची गर्दी होत असते.
दरम्यान यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याने या भागांतील अनेक कुटुंबीयांनी,तरुणाईने आपले मुंबईतील बेत रद्द केल्याने त्यांची सर्वात जास्त गर्दी यावर्षी वज्रेश्वरी परिसरात होण्याची शक्यता आहे.वज्रेश्वरी जवळील अकलोली कुंड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात खासकरून तरुण पार्ट्या करण्यासाठी येऊन हुल्लडबाजी करत असतात आणि या ठिकाणी रात्री बिअर बार बंद झाल्यावरही सर्रासपणे चोरून दारू विक्री होत असते त्यामुळे रात्रभर तरुण झिंगून धिंगाणा करीत असतात आणि याचा प्रचंड त्रास येथे येणाऱ्या कुटुंबाना होतो त्यामुळे येथे चोरून दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांची गस्त वाढविण्यात येऊन ३१ डिसेंबर रोजी ज्यादा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी मागणी भाविक पर्यटक आणि परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसर सज्ज
Reviewed by News1 Marathi
on
December 29, 2020
Rating:

Post a Comment