कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार
मुंबई, ३ डिसेंबर २०२० : अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्यामुळे पिवळा धातू आणि कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. मात्र बेस मेटलचे दर घसरले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तसेच संभाव्य लसीची आशा मावळत असल्याने सोन्याने उच्चांकी स्थिती गाठली. अमेरिकी तेलसाठ्यात घसरण सुरूच असल्याने कच्च्या तेलाचे दर वधारले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: डॉलरच्या निर्देशांकात घसरण व जगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सोन्याचे दर ०.६५% नी वाढले व तर एमसीएक्सवरील सोन्याने १.१९% ची वृद्धी दर्शवली. जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णात वाढ आणि अनेक देशांमध्ये नवे लॉकडाऊन लागल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच जागतिक मध्यवर्ती बँकांच्या आधारामुळे सोन्याच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जो बिडेन यांचे व्हाइट हाऊसमधील हस्तांतरणामुळे बाजारातील भावना सकारात्मक झाल्या. तथापि, अतिरिक्त प्रोत्साहन विधेयकाबद्दल शंका असल्याने सोन्याच्या दरातील नफ्यावर मर्यादा आल्या. वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे संभाव्य लसीची सकारात्मकता कमी झाली. त्यामुळे सोन्याला काहीसा आधार मिळाला.
कच्चे तेल: अमेरिकेच्या तेलसाठ्यात घसरण झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.६% नी वाढले तर एमसीएक्स क्रूडचे दर १.३७% नी वधारले. बाजाराच्या अपेक्षा -१.७ एम होत्या. त्या तुलनेत साठ्याची आकडेवारी -०.७ एवढी झाली. ओपेक+ आणि सदस्यांमधील जानेवारी २०२१ मध्ये उत्पादन वाढ किंवा कपात कायम ठेवण्यामधील चर्चेमुळे तेलातील वृद्धीला आधार मिळाला.
ओपेक+ ग्रुप २०२१ पासून २ दशलक्ष बीपीडी उत्पादन कपातीवरील निर्बंध हटवेल, अशी चर्चा आहे. तथापि, साथीच्या काळात मागणी कमकुवत झाल्याने २०२१ च्या पहिल्या महिन्यापर्यंत ओपेक+ कडून उत्पादन कपात सुरूच राहण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने तसेच नव्याने लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत आणखी घट होऊ शकते. संभाव्य कोरोना लसीची शक्यता असली तरीही अतिरिक्त पुरवठ्याच्या चिंतेने तेलाचे दर दबावाखालीच राहू शकतात.

Post a Comment