हनुमान नगर, दुर्गानगर परिसरात बंदिस्त गटारांच्या कामाला सुरवात नगरसेविका हेमलता यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. १०१ हनुमान नगर, दुर्गानगर परिसरात उघडी गटारे बंदिस्त करण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. स्थानिक नगरसेविका हेमलता कैलास पावशे यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांच्याहस्ते श्रीफळ फोडून या कामाला सुरवात करण्यात आली.
कल्याण पूर्वेतील अनेक भागांमध्ये गटारे उघडी असल्याने दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य याठिकाणी असते. या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या उघड्या गटारांमुळे लहान मुलं देखील या गटारात पडण्याची भीती असते. हि समस्या प्रभाग क्र. १०१ मधील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका हेमलता पावशे यांच्याकडे मांडली असता त्यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि गटारे बंदिस्त करण्याचे काम मंजूर करून घेतले. त्यानुसार याठिकाणी सिमेंट काँक्रीटद्वारे गटारे बंदिस्त करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. १०१ मधील शीतल अपार्टमेंट ते सरस्वती अपार्टमेंट, अंबिका दर्शन अपार्टमेंट, श्रीदेव कॉम्प्लेक्स या ठिकाणी गटारे बंदिस्त करण्याच्या कामाचे आज नगरसेविका हेमलता पावशे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. कामाला सुरवात केल्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका हेमलता पावशे यांचे आभार मानले. यावेळी समाजसेवक कैलाश पावशे, रदनेश पावशे, चंद्रकात पावशे, गोविंद भोईर, गणेश पावशे, राजन सिंग, मुकेश पावशे, गणेश भोईर, कविता पावशे, अनिता बोरुडे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Post a Comment