Header AD

अखेर मीनाताई उड्डाणपुला वरून दुतर्फा वाहतूक सुरू

 ठाणे, प्रतिनिधी   :  बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक) दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून अखेर दुतर्फा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे. या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या दुहेरी वाहतुकीमुळे बाबुभाई पेट्रोल पंप, तसेच मीनाताई ठाकरे चौक (कॅसल मिल) येथे होणारी वाहतूककोंडी टाळता येणार आहे.


शहरातील अंतर्गत वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहरात नौपाडा, वंदना सिनेमागृह आणि कॅसलमिल येथे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या उड्डाणपुलांच्या उभारणीनंतर काही प्रमाणात या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यास मदत झाली आहे. पण, मीनाताई ठाकरे चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने घोडबंदर रोडकडून येणाऱ्या वाहनचालकांनाच दिलासा मिळाला होता. या उड्डाणपुलामुळे माजीवडा नाक्यावरून येणाऱ्या वाहनांना थेट जेल तलाव अथवा एलबीएस मार्गावर उतरता येते. पण त्याचवेळी एलबीएस मार्गावरून माजीवडा नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बाबुभाई पेट्रोल पंपासमोरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते.


खोपट येथील एसटी स्टॅंडच्या सिग्नलवरून मोठया प्रमाणात वाहने सुटल्यानंतर त्यांची बाबूभाई पेट्रोलपंपासमोर कोंडी होत होती. पेट्रोलपंपावरील वाहनांची रांग आणि सिग्नलवरून येणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी होत होती. या कोंडीतून सुटका होण्यासाठी अनेक राजकीय पक्षाकडून, तसेच लोकप्रतिनिधीकडून या उड्डाणपुलाचा शंभर टक्के वापर होण्यासाठी बाबूभाई पेट्रोल पंपाच्या येथून माजीवडाच्या दिशेने या उडडाणपुलावर दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी होत होती. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडेही या उड्डाणपूलावरुन दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.


त्यानुसार ठाणे वाहतूक विभागाकडून या परिसराची पुन्हा पाहणी करण्यात आली. त्यानंतर या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.  तसेच, सुरक्षित वाहतुकीसाठी पुलावर बॅरिकेड्स टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दुहेरी वाहतुकीमुळे प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेत एलबीएस मार्गावरून माजीवडा नाक्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


वाहनचालकांच्या सुविधेसाठी निर्णय - बाळासाहेब पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त

एलबीएस मार्गावरून माजीवडा नाक्याकडे जाताना बाबूभाई पेट्रोलपंप येथे वाहनांची कोंडी होत होती. अंतर्गत रस्त्यावर रहदारीच्या वेळेत या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेशी चर्चा करून येथील उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दुहेरी वाहतुकीसाठी आवश्यक त्या वाहतूक सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण मार्गावर रस्तादुभाजक म्हणून प्लास्टिक बोलार्ड आणि काही ठिकाणी स्पीड हम्प्स लावणे व पुलाच्या सुरुवातीला ‘दुहेरी वाहतूक मार्ग’ असा फलक लावणे ई. बाबींसाठी महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे, असेही ते म्हणाले.

अखेर मीनाताई उड्डाणपुला वरून दुतर्फा वाहतूक सुरू अखेर मीनाताई उड्डाणपुला वरून दुतर्फा वाहतूक सुरू Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads