अँटीबॉडीज तुम्हाला कोविड-१९चा पुनर्संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवू शकत नाहीत तो काही तुमचा ‘इम्युनिटी पासपोर्ट’ नाही.
केरळच्या कासारागोड येथे ३ फेब्रुवारी २०२० रोजी कोविड-१९ चा भारतातील पहिला निश्चित रुग्ण सापडला त्या गोष्टीला दहा महिने उलटून गेले आहेत, तरीही या नोव्हेल कोरोनाव्हायरसविषयी आपल्याला अजूनही ब-याच गोष्टी ज्ञात व्हायच्या आहेत. आपल्या देशातील करोनारुग्णांची एकूण संख्या आज ९.८८ दशलक्ष असून कोविड-१९ मधून ब-या झालेल्या व्यक्तींना या विषाणूचा पुनर्संसर्ग (री-इन्फेक्शन) होण्याची मोठीच आशंका सर्वांच्या मनात आहे. नुकताच कोविड-१९ चा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज त्या व्यक्तीला संरक्षण पुरवू शकतात का आणि पुरवत असतीलच तर त्या किती काळापर्यंत प्रभावी राहतात, अशा अँटीबॉडीज पुनर्संसर्गाशी सामना करण्याइतक्या शक्तिशाली असतात का, या विषयावर अजूनही खूप संशोधन होण्याची गरज आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये हाँगकाँगमधील एका ३३ वर्षीय पुरुषाला एकाच विषाणूचा दुस-यांदा संसर्ग झाला तेव्हाच “एखाद्या व्यक्तीला कोविड-१९ चा पुनर्संसर्ग होऊ शकतो का?” या प्रश्नाचे उत्तर मिळून गेले होते! यानंतर अमेरिकेत एका २५ वर्षीय पुरुषाला अशाच प्रकारे दुस-यांदा विषाणूसंसर्ग होण्याची घटना घडली. अद्याप या घटनांचे इतर समान घटनांच्या संदर्भात परीक्षण केले गेलेले नसले तरीही पुनर्संसर्गाची भीती निराधार नाही ही गोष्ट मात्र यातून पुरेशी स्पष्ट झाली आहे. SARS-CoV-2 (कोविड-१९ ला कारणीभूत ठरणारा विषाणू) हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या इतर कोरोना विषाणूंच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत आहे, त्यामुळे त्याचा पुनर्संसर्ग ही केवळ अपवादात्मक बाब राहणार नाही तर सर्रास आढळून येणारा प्रकार ठरू शकेल या गोष्टीची नोंद या जागतिक घडामोडींनंतर घेण्यात आली.
अशाप्रकारे कोविड-१९ ची पुन्हा लागण होणे हीच जर ‘स्वाभाविक‘ गोष्ट बनणार असेल तर दरवर्षी ऋतुबदलाच्या वेळी सर्दीताप घेऊन येणा-या साध्यासुध्या विषाणूंप्रमाणेच हा विषाणूही वागेल का? तर, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण दोन प्रकारच्या विषाणूंमधील एक ठळक फरक समजून घ्यायला हवा, आणि तो म्हणजे मोसमी सर्दी प्राणघातक नसते, पण कोविड-१९ प्राणघातक ठरू शकतो, व त्याचा शरीरावर विनाशकारी आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो!
अँटीबॉडीजचे आयुर्मान आणि त्याची ताकद यांचा सखोल अभ्यास होण्याची गरज जगभरातील संशोधक सातत्याने मांडत असतात. त्यासाठी नजिकच्या काळात कोविड-१९ होऊन गेलेल्या व्यक्तींच्या अधिक विस्तृत गटांच्या व्यापक पाहण्या हाती घ्याव्या लागतील. आपल्याकडे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोविड-१९ वर उपचार घेतलेल्या व्यक्तींमधील पुनर्संसर्गाच्या प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे. आकडेवारीवर आधारित अधिकाधिक तथ्ये अजून आपल्या हाताशी लागायची आहेत, पण दरम्यानच्या काळात अँटीबॉडीजना गृहित धरून चालणार नाही याची खूणगाठ आपण मनाशी बांधायला हवी. जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने अगदी नेमक्या शब्दांत सांगितल्याप्रमाणे अँटीबॉडीज हा काही आपला इम्युनिटी पासपोर्ट नाही.
कोविड-१९ च्या पुनर्संसर्गाला विरोध करण्याच्या आपल्या अँटीबॉडीजच्या क्षमतेविषयी प्रत्यक्ष माहितीवर आधारित काही खराखुरा निष्कर्ष काढणे शक्य नाही इतके तर आता स्पष्ट झाले आहे. तेव्हा आता आपण या विषाणूवर मात करण्याच्या पुढील टप्प्याविषयी - अर्थात लसीकरणाविषयी बोलू. हा लसीकरण कार्यक्रम कशाप्रकारे पुढे जाईल, आपल्यापैकी किती जणांनी किती लवकरात लवकर लस मिळेल आणि लस टोचून घेणे महत्त्वाचे का आहे या गोष्टींकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे.
लसींचे वितरण: नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या लसीला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर सार्वजनिक लसीकरण म्हणजे मास व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबविण्यासाठीच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच प्रसिद्ध केल्या आहेत.
प्राधान्यक्रम: ही लस सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून दिली जाईल, पहिल्या टप्प्यातील लसीकरणामध्ये आरोग्यकर्मी, पहिल्या फळीत काम करणारे कर्मचारी, ५० वर्षांपुढील वयोगटातील व्यक्ती आणि ५० वर्षांच्या आतील पण इतर आजार असलेल्या व्यक्ती यांना लक्ष्य केले जाईल.
लस का घ्यायला हवी?: कोविड-१९ ची लस घेतली असेल तर तुम्ही कोरानाच्या संसर्गाने गंभीर आजारी पडणार नाही आणि त्यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या व्यक्तींनी, विशेषत: अधिक धोका असलेल्या व्यक्तींनी संरक्षण मिळेल.
पुनर्संसर्ग हे वास्तव आहे ही गोष्ट आता आपल्याला कळून चुकली आहे, तेव्हा नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कोविड-१९ लसीची वाट पाहत असताना, आपण स्वत:च्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत राहू या. तुम्ही वर दिलेल्या गटांमध्ये मोडत नसाल तर लस तुमच्यापर्यंत पोहोचायला अजून काही महिने जातील. तेव्हा सुरक्षित रहा, सकारात्मक रहा आणि तुम्हाला याआधी कोविड-१९ ची बाधा झाली असली तरीही अँटीबॉडीजना गृहित धरून त्यांच्यावर विसंबून राहू नका!

Post a Comment