Header AD

माधवबाग, एक रम्य सायंकाळ, भाग ०२डॉ अनिल पावशेकर

************************************************************

हळूहळू सुर्यदेवाने निरोप घेतला आणि पशु,पक्षी आपल्या घरट्याकडे निघाले होते. शांत निरव आणि आल्हाददायक वातावरण सर्वत्र जाणवत होते. एव्हाना जसजसा कार्यक्रमाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याप्रमाणे माधवबाग टीमची लगबग पाहण्यासारखी होती. अर्थातच टूडी इको मशिनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी माधवबागच्या प्रांगणातच वृक्षवेलींच्या गराड्यात मनमोहक सजावटीचा छोटेखानी सभामंच तयार करण्यात आला होता. हिरव्यागार पार्श्वभूमीवर कृत्रिम प्रकाशात सभामंच उजळून निघाला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.


प्रारंभीच्या प्रस्तावनेनंतर लगेचच डॉ नाना पोजगे आणि डॉ बी पी टावरी यांनी मार्गदर्शनपर उद्बोधन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते टूडी इको मशिनचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ अशोक जैस्वाल, डॉ प्रदिप पाटील, डॉ अश्विन सुळे, डॉ ढोकणे, डॉ पठाण, डॉ बापट, डॉ निनावे, डॉ बरडे प्रामुख्याने उपस्थित होते. तर श्रीपाद उपासनी आणि योगेश वालावलकर विशेष अतिथी म्हणून समारंभाला हजर होते.


जवळपास एक तास रंगलेल्या या उद्घाटन सोहळ्यानंतर वेळ होती ती ज्ञानरंजनाची आणि मनोरंजनाची. यासाठी कोंढाळी काटोल मार्गावर जवळच असलेल्या ऑरेंज शिवाना फार्म हाऊसची निवड करण्यात आली होती. खरेतर फार्म हाऊसवर जाण्याच्या निव्वळ कल्पनेनेच आपण सुखावून जातो. कारण रोजरोजच्या त्याच त्या रहाटगाड्याला आपण कुठेतरी वैतागलो असतो. शिवाय समविचारी मित्रमंडळी सोबत असली की जहां भी जाओ, लगता है तेरी महफिल है असेच असते. 


शिवाय कुठेतरी मनात दडलेली भावना पंछी बनू उडके फिरु आज गगणमे, आज मै आझाद हुं दुनिया के चमन मे असल्याने अशा प्रसंगी हर्षवायु झाला असेल तर त्यात नवल कसले. पंधरा मिनिटांत आम्ही फार्महाऊसला पोहोचलो. मात्र कारमधून खाली उतरताच आपण कोंढाळी ऐवजी थेट काश्मिरला तर पोहोचलो नाही ना असा भास झाला. कारण एकतर हा नैसर्गिक, जंगली, मोकळा भाग, सोबतीला हाडे गोठविणारी थंडी. यावेळी आम्ही थंडीला भित नाही ही जी फुशारकी मारत होतो ती आमच्या चांगलीच अंगलट आली होती.


यावेळी आम्हाला देशमे डर का माहौल है याची आठवण झाली. मात्र आमची भिती अन्य कोणत्याही कारणाशिवाय फक्त थंडीमुळे होती. लगेच आम्ही सुद्धा मनातल्या मनात जेएनयू छाप नारे लगावले. हमें चाहीऐ ठंडसे आजादी आणि चमत्कार झाला. आमची कुडकुडती अवस्था पाहून लगेचच एका व्यक्तीने आमच्यासाठी शेकोटी पेटवली आणि आमचा पुढचा नारा हमे चाहीऐ भुक से आझादी साठी मनोमन तयार झालो होतो. अर्थातच यावेळी ज्ञानरंजनाकरीता दोन सेशन असल्याने आम्ही थोडा संयम बाळगत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केला.


सिएमई करिता डॉ दिनेश पाटील आणि डॉ गुरूदत्त अमिन हे दोन प्रमुख कसलेले वक्ते होते. ह्रदयरोग निदान, उपचारात टुडी इकोचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत दोन्ही वक्त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यासोबतच माधवबागची कार्यप्रणाली आणि आतापर्यंतच्या वाटचालीवर एक दृष्टीक्षेप टाकण्यात आला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सैन्य हे पोटावर लढत असतं तर श्रोते हे पोटावर बसले असतात. यामुळे श्रोत्यांच्या क्षुधाशमनासाठी अधूनमधून स्नॅक्सचा पुरवठा होताच आधी पोटोबा मग ज्ञानोबा या न्यायाने श्रोत्यांनी कडाक्याच्या थंडीला झुगारून जवळपास एक तास ज्ञानार्जन करून घेतले.


सरतेशेवटी वेळ होती मनोरंजनाची आणि आमचा आत्मा खरेतर नेहमीप्रमाणे इथेच घुटमळत असतो. स्टेज, माईक, संगीत हा आमचा विकप्वाईंट आहे. भलेही आम्ही नाच, गाणे या कलेपासून कोसभर दुर असलो किंवा पप्पू कान्ट डान्स असलो तरी मध्येमध्ये मिरविण्याची भारीच हौस असते. त्यातच आमचे परममित्र डॉ स्वप्नील नांदे हे आपल्या गोड गळ्याने सर्वांना हमखास आकृष्ट करत असतात. आजसे पहले आजसे जादा खुशी आजतक नहीं मिली असो की जाने क्या बात है, निंद नहीं आती, बडी लंबी रात है सारख्या दर्जेदार गाण्यांची बरसात होताच उपस्थित सर्वांचे कान तृप्त झाले.


अखेर फायनल तडका म्हणून झिंग झिंग झिंगाट सुरू होताच बहुतांश मंडळींनी स्टेजकडे धाव घेतली आणि फेर धरून नाचायला लागली. संगीत हेच प्रेम, संगीत हाच धर्म याची यावेळी प्रचिती आली. यातच मग काही दमले भागले मित्र हळुहळू स्टेज सोडत बुफेला शरण गेले आणि याप्रसंगी आम्ही त्यांना मनापासून साथ दिली. सुग्रास जेवणाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आता वेळ होती सायोनारा करण्याची. लगेचच आम्हीही पाय आटोपता घेतला आणि ज्ञानरंजन, मनोरंजनाची रेलचेल करत एक रम्य सायंकाळ आयोजित केल्याबद्दल संपूर्ण माधवबाग टीमला मनःपुर्वक धन्यवाद देत नागपूरचा रस्ता पकडला. 
वर्णन समाप्त.

*************************************
दि. २२ डिसेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
++++++++++++++++++++++++++++
माधवबाग, एक रम्य सायंकाळ, भाग ०२ माधवबाग, एक रम्य सायंकाळ, भाग ०२ Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads