भिवंडीत बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा
भिवंडी , प्रतिनिधी : वयोवृद्ध ७० वर्षीय बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या पोटच्या मुलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.एम.जोशी यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.सुरेश धर्मा धिंडा (५३) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील पेंढरीपाडा - ब्राह्मणगाव (पायेगांव) येथे १७ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.
शेतात काम करण्याच्या वादातून हत्या
आरोपी सुरेश धर्मा धिंडा याला मृतक वडील धर्मा शंकर धिंडा यांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी खल्यावर भाताचे भारे झोडणीचे काम करण्यास सांगीतले होते.त्यावेळी बाप - लेकामध्ये शिवीगाळ झाली होती.याच रागातून आरोपी सुरेशने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने बापावर हल्ला करून जागीच ठार मारले होते. तर बापाची निर्घृण हत्या केल्यांनतर आरोपी सुरेश पोलिसांच्या भीतीने घटनास्थळावरून फरार झाला होता.पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता एका गुप्त बातमीदराच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला वसईमधील पाली गावातील एका मासेमारी बोटीवरून अटक केले होती.
पोलिसांनी न्यायालयात सादर केले सबळ पुरावे...
या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी एपीआय राजीव पाटील आणि त्यांच्या पथकातील एएसआय दिलीपसिंग रजपूत, पोह.दयानंद तोरणे, पोलीस नाईक भरत शेगर , राजेंद्र शेंद्रे,कैलास वाढविंदे, आणि जयेश मुकादम या पोलिस पथकाने आरोपी सुरेशला अटक केली होती.तर तपास अधिकारी एपीआय राजीव पाटील यांनी गुन्ह्याचा तपास उत्तमप्रकारे केला याची दखल घेऊन तत्कालीन कोकण विभागीय पोलीस महानिरीक्षक किशोर नवल बजाज यांनी पोलिस पारितोषिक प्रदान करून गौरव केला होता.
आज दुपारी या हत्येप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन वयोवृद्ध बापाची निर्घृण हत्या केल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सरकारी वकील म्हणून मती मोहळकर यांनी युक्तीवाद केला. तर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय राजीव पाटील व पोलीस पथकाने वेळोवेळी सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Post a Comment