ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देणार
कल्याण , कुणाल म्हात्रे : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावांतील सलोख्यास बाधा पोहोचत असल्याने गावपातळीवरील या निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात, या हेतूने आमदार गणपत गायकवाड यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पारपाडून २५ लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघते. प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रचंड प्रमाणावर पैश्यांची उधळपट्टी निवडणुकांवर होते. सद्य:स्थितीत कोरोना संकटाने जनता व प्रशासन त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार गेलाय. सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कोरोना वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी, राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी, याकरिता ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात व गावागावात एकोपा कायम राहावा या हेतूने आमदार गणपत गायकवाड यांनी मतदारसंघातील ग्रामस्थांसाठी ही घोषणा केली आहे.
मतदार संघातील ज्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होईल त्या सर्व ग्रामपंचायतींना आमदार निधीसह आमदारांच्या अखत्यारित असणाऱ्या इतर शासकीय योजनांमधून २५ लाख रुपयांचा जादा निधी विकासकामांसाठी त्यांनी जाहीर केला. हा निधी बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या-त्या कामांवर खर्च करण्यात येणार आहे. या आनुषंगाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. मतदार संघातील अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Post a Comment