सुका कचरा संकलित करण्याच्या मोहिमेअंतर्गत तब्बल ४ टन कपडे संकलित
■महिला बचत गटांकडुन कापडी पिशव्या शिवुन सक्षमीकरण...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रात शुन्य कचरा मोहिमेची व्यापक अमंलबजावणी सुरू असुन कचराकुंडीमुक्त कचरामुक्तीकडे वाटचाल होण्याबाबत मनपा अँक्शन मोड मध्ये असुन प्रभावी पाऊले टाकीत कचरामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये सुका कचरा संकलित करण्याच्या मोहिमेअंतर्गत तब्बल ४ टन कपडे संकलित करण्यात आले असून या कपड्यांच्या महिला बचत गटांकडुन कापडी पिशव्या शिवुन महिलांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
महापालिका परिसर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ रहावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेने दि.२५ मे पासून महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबविली आहे. यामध्ये नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगिकरण करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ओल्या कचऱ्यावर बायोगॅस व कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. परंतु सुका कचरा एकत्रित स्वरूपात संकलित होत असल्यामुळे त्यातील प्रत्येक घटक उपयुक्त ठरत नाही. याकरिता महापालिकेने विविध एन. जी.ओ. च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ई - वेस्ट, दुसऱ्या रविवारी कापड, गादया, जुने कपडे इ., तिसऱ्या रविवारी कागद व काच आणि चौथ्या रविवारी चप्पल, बूट, फर्निचर तसेच प्रत्येक रविवारी प्लास्टिक आदी सामान(सुका कचरा) महापालिकेच्या संकलन केंद्रामध्ये आणून देणेबाबत यापूर्वीच आवाहन केले आहे.
त्या अनुषंगाने काल दुसऱ्या रविवारी कपडे संकलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आणि सिद्धी वेस्ट टू ग्रीन या संस्थेच्या मदतीने तब्बल ४ टन कपडे महापालिकेकडे संकलीत झाले. या संकलीत कपड्यांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या शिवून बाजारात उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्यामुळे प्लास्टिक पिशवीला सक्षम पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे प्लास्टिक रु.२/- प्रति किलो व कागद रु.१/- प्रति किलो प्रमाणे नागरिकांकडून स्विकारण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे आणि उप अभियंता मिलिंद गायकवाड यांनी विशेष श्रम घेतले असून आपले शहर अधिक सुंदर व स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी रामदास कोकरे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment