Header AD

"मेलबोर्नला रहाणेचा संघ अजिंक्य" भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी, भाग ०२


अगंबाई अरेच्चा ....डॉ अनिल पावशेकर

*************************************************************


चार कसोटींच्या मालिकेत कांगारूंनी पहिली बाजी मारत आपली दादागिरी दाखवली होती.  तसेही परदेशात, विशेषतः कसोटी सामन्यांच्या बाबतीत टीम इंडिया नेहमीच तुरळक अपवाद वगळता नैतिक विजयाचा दावेदार राहिला आहे. त्यातच ॲडीलेडला आमची माती, आमची मानसं च्या दारुण प्रयोगानंतर मेलबोर्नला कमीतकमी ३६ चा आकडा पार केला तरी टीम इंडियाचे गंगेत घोडे न्हाले म्हणून समजायला हरकत नव्हती. मात्र भारतीय गोलंदाजांनी एमसीजीला कात टाकली आणि कांगारूंना २०० च्या आत लोळवत सामन्याची सुत्रे फलंदाजांच्या हाती दिली.खरेतर पहिल्या दिवशी खेळपट्टी आणि फलंदाज यांचे ३६ गुण अजिबात मिळत नव्हते. त्यातच बाऊन्स आणि स्विंगचे राहुकेतू आपल्या फलंदाजांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. सोबतच भारतीय फलंदाजीचा मुकुटमणी आणि विश्वासराव म्हणजेच विराट स्वमुलखात परतल्याने टीम इंडियाच्या फलंदाजीला मंगळग्रह अटळ होता. मात्र समाधानाची बाब म्हणजे फलंदाजीत शुभमन गिल आणि रिषभ पंतचा समावेश झाल्याने थोडी आशादायी परिस्थिती नक्कीच होती. तसेच गावस्कर बॉर्डर ट्रॉफी करीता टीम इंडियाकडून पृथ्वी शॉ, मयंक अग्रवालचा स्टार्क ॲंड कंपनीला बळीरुपात नैवेद्य देण्याचा गुप्त करार झाला असावा याप्रकारे हे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत.निश्चितच कांगारूंना झटपट गुंडाळल्याने टीम इंडियावर अतिरिक्त ओझे नव्हते तरीपण पहिल्या डावातल्या लिडचे महत्व अनन्यसाधारण असते. भलेही मयंक अग्रवाल अपयशी ठरला तरी शुभमन गिल ने आश्वासक फलंदाजीने टीम इंडियात जान आणली. मुख्य म्हणजे स्वत: अजिंक्य रहाणे एक फलंदाज म्हणून काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. टी ट्वेंटी आणि वनडेत वगळल्याचे शल्य तो उरात बाळगून होता मात्र याच शल्याचे त्याने शतकात रूपांतर करून त्याच्या टिकाकारांना गप्प केले. चमत्कारा शिवाय नमस्कार नाही ही जगाची रित च आहे आणि रहाणे सुद्धा याला अपवाद कसा असणार.


अर्थात रहाणेने फलंदाजीचा तंबू जरी गाडला असला तरी पुजारा आणि विहारी या दोघांनी जवळपास १३६ चेंडू खेळून कांगारू एक्स्प्रेसला थोपवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. त्यातच रिषभ पंतने ॲक्सलेटर दाबून फलंदाजीत उर्जा आणली होती. मात्र या सर्वांवर कळस चढविण्याचे काम केले ते अष्टपैलू रविंद्र जडेजाने. टी ट्वेंटी, वनडे असो की कसोटी,, सध्यातरी जडेजा ची फलंदाजी गुल, गुलशन, गुलफाम मुडमध्ये असून आयसिंग ऑन दी केक काय असते हे त्याच्या बॅटने दाखवून दिले आहे. भलेही आपले शेपूट फार वळवळले नाही मात्र १३० धावांच्या आघाडीने टीम इंडिया ड्रायव्हिंग सिटवर जाऊन बसली होती.पहिल्या डावातील लिडच्या फायद्याने भारतीय गोलंदाजांना आकाश दोन बोटे उरले होते. त्यातच स्टिव्ह स्मिथला बुमराहने गुमराह करत तंबूत धाडल्याने कांगारू फलंदाजांचा प्राण तळमळला होता. खेळपट्टी अश्विन जडेजा वर भाळली असल्याने बुमराह, मो.सिराजला आपले खांदे फारसे दुखवावे लागले नाहीत. मॅथ्यू वेड, लाबुशेन आणि ग्रीन ने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनके हारे सब हारे असल्याने त्यांनी मेलबोर्नच्या पराभवाची पटकथा बहुदा फार लवकर वाचली असावी.वास्तविकत: सामान्य संघाने नोंदवलेला असामान्य विजय म्हणून या कसोटी विजयाची इतिहासात नोंद नक्कीच केली जाईल. हा विजय केवळ योगायोग नव्हे तर फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कष्टाने मिळवलेला विजय आहे. मुख्य म्हणजे आजवर फारसा प्रकाशझोतात नसलेला अजिंक्य रहाणे त्याच्या कर्तृत्व शैलीने उजळून निघाला आहे. टीम इंडिया म्हणजे सबकुछ विराट कोहली हा सुद्धा गोड गैरसमज या विजयाने मोडून काढला आहे. शिवाय विदेशात आपल्या फिरकीपटूं बाबत प्रश्नचिन्ह उभारणाऱ्यांनाही याचे उत्तर नक्कीच मिळाले असेल.कांगारू बाबत बोलायचे झाले तर गोलंदाजीत ते आजही अव्वलच आहेत. मात्र त्यांना या सामन्यात लय सापडली नाही. शिवाय त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी भारतीय क्षेत्ररक्षकांचा मागील काही सामन्यातला कित्ता गिरवलेला दिसतोय. कॅचेस विन मॅचेस हे आजही तंतोतंत लागू होते. विशेषतः अजिंक्य रहाणे वर त्यांनी विशेष मेहेरनजर दाखवत स्वतःची कबर खोदून घेतली. फलंदाजीत डेव्हीड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ॲरोन फिंच सारखे डोकेदुखी फलंदाज नसल्याने भारतीय तंबूत समाधानाचे वारे वाहत होते. तर मॅथ्यू वेड अतिआक्रमकतेचा शिकार झालेला दिसतोय. दोन्ही संघांनी एक एक सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली असल्याने उर्वरित कसोटीतही क्रिकेट प्रेमींना अशीच जुगलबंदी बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.


************************************
दि. ३० डिसेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
+++++++++++++++++++++++++++
"मेलबोर्नला रहाणेचा संघ अजिंक्य" भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी, भाग ०२ "मेलबोर्नला रहाणेचा संघ अजिंक्य" भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी, भाग ०२ Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads