कांबा, काटई, खोणी गावाचा पाणीपुरवठा लवकरच सुरळित खासदार कपिल पाटील यांची स्टेम अधिकाऱ्यांबरोबर चर्चा
भिवंडी, प्रतिनिधी : कांबा, काटई, खोणी गावाचा पाणीपुरवठा लवकरच सुरळित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खासदार कपिल पाटील यांना स्टेमच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. तिन्ही गावांतील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांच्याबरोबर ठाण्यातील स्टेम कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपाचे नगरसेवक सुमित पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक घरत, तिन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, स्टेमचे अधिकारी उपस्थित होते.
कांबा, काटई, खोणी गावांची ३५ ते ४० वर्षांपूर्वीची लोकसंख्या गृहित धरून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आता या गावांमध्ये कित्येक पटीने लोकसंख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली. त्याचबरोबर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयापासून गावांपर्यंत आलेल्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ जोडण्या घेण्यात आल्या असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पाणीपुरवठा कमी होत असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी नमूद केले.या प्रश्नावर लवकरात लवकर योग्य पावले उचलून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांडगे यांनी दिले. त्यामुळे लवकरच या तिन्ही गावांचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
कांबा, काटई, खोणी गावाचा पाणीपुरवठा लवकरच सुरळित खासदार कपिल पाटील यांची स्टेम अधिकाऱ्यांबरोबर चर्चा
Reviewed by News1 Marathi
on
December 02, 2020
Rating:

Post a Comment